वृक्ष संवर्धनाची शपथ घेत साजरा केले रक्षाबंधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 02:46 PM2018-08-26T14:46:54+5:302018-08-26T14:47:53+5:30
झाडांभाेवतीचे लाेखंडी जाळ्या काढून झाडांना राखी बांधत अनाेख्या पद्धतीने रावेत येथे रक्षाबंधन साजरे करण्यात अाले.
रावेत : रक्षाबंधन निमित्त पर्यावरणाच्या रक्षणासाठी अंघोळीची गोळी , रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी , संवाद युवा प्रतिष्ठान, केदारेश्वर प्रतिष्ठान , शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झाडाभोवती असणाऱ्या लोखंडी जाळ्या काढून रक्षाबंधनानिमित्त वृक्षसंवर्धन करण्याची शपथ घेवून वृक्षांना राखी बांधली. झाडांना राखी बांधत रक्षाबंधन सण वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीची रक्षा करण्याकरिता सदैव कटीबद्ध असतो. त्याचप्रमाणे झाडाला राखी बांधून त्याची रक्षा व संगोपन करण्याची शपथ यावेळी घेण्यात आली. शहरात वृक्षारोपण करताना झाडांच्या सुरक्षतेसाठी लावण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या वर्षोनुवर्षे झाडाभोवती तशाच राहिल्याने झाडांची वाढ खुंटत होती परिपूर्ण वाढ झालेल्या झाडाभोवतालची लोखंडी जाळ्या काढून झाडांना राखी बांधून आगळा वेगळा रक्षा बंधन वाल्हेकरवाडी येथे साजरा करण्यात आला. या सामाजिक संस्थाने अनोखं रक्षाबंधन साजरे करून झाडांना लोखंडी जाळ्याच्या जोखडीतून मुक्त करण्यात आले. वाल्हेकरवाडी येथील गावठाण परिसरातील मोठ्या झाडाभोवताली असणाऱ्या लोखंडी जाळ्या झाडाच्या वाढीला रोखून ठेवत होत्या ही बाब पर्यावरण प्रेमींच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी झाडाभोवती असणाऱ्या लोखंडी जाळ्या काढल्या त्यामुळे झाडांनी मोकळा श्वास घेतला.प्रदीप वाल्हेकर, सुभाष वाल्हेकर, युवराज वाल्हेकर, सचिन काळभोर,पंडित वाल्हेकर, कोंडीबा शिवले , अभिषेक वाल्हेकर, गणेश बोरा , सुयोग वाल्हेकर, गौतम बागुल,राहुल धनवे, प्रदीप पटेल,प्राजक्ता रुद्रवर, स्वाती वाल्हेकर, राजीव भावसार,अन्वर मुलाणी,रवींद्र कुंवर,माऊली जगताप,संतोष वाघ,किशोर तांगडे पाटील आदी रोटरी सदस्य अंघोळीच्या गोळीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
रक्षाबंधनानिमित्त ज्या झाडाला राखी बांधली त्याचे आयुष्यभर संवर्धन करावे. तसेच अन्यत्रही असलेल्या झाडांचे संवर्धन करावे, सध्या पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. झाडांच्या कत्तली होत आहे. त्यामुळे झाडांची लागवड करून रक्षण करणे नितांत गरजेचे आहे. वृक्षारोपण करताना रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांच्या खोडाच्या सभोवताली लोखंडी जाळ्या बसविल्याने वृक्षाच्या खोडाला व मुळांना हवा (ऑक्सिजन) व पाणीपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या वृक्षांच्या खोडाच्या सभोवताली असणाऱ्या जाळ्या काढून टाकण्यात आल्या.
यावेळी वृक्षांच्या खोडाच्या सभोवताली असणाऱ्या जाळ्या काढल्याने वृक्ष आता मोकळा श्वास तर घेणार आहेतच शिवाय त्यांचे आयुर्मान वाढण्यासही मदत होणार असल्याचे मत अंघोळीची गोळी पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष सचिन काळभोर यांनी व्यक्त केले आहे.