रक्षाबंधन-दृष्टी परिवर्तनाचा सण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:40 AM2018-08-28T00:40:32+5:302018-08-28T00:40:52+5:30
एकनाथ पवार : महापालिकेच्या स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांचाही सहभाग
पिंपरी : भारतीय संस्कृती ही पवित्र दृष्टीने आणि आईच्या भावनेतून पाहण्याचा संदेश देणारी आहे. रक्षाबंधनाचा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण असल्याचे मत महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी व्यक्त केले. बहीण-भावाच्या स्नेहबंधनाचे पवित्र नाते जपणारा रक्षबंधन सगळीकडे साजरा होतो आहे. याच रक्षाबंधनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वच्छता महिला कर्मचारी यांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांना स्वच्छता महिला कर्मचाºयांनी राखी बांधून दीर्घ आयुष्य आणि सुख लाभो म्हणून प्रार्थना केली.
पूर्णानगर येथील पक्षनेते पवार यांच्या संपर्क कार्यालयात रक्षाबंधनाचा सण साजरा केला. या स्वच्छता कर्मचाºयांना रक्षाबंधननिमित्त भेट देण्यात आली. या वेळी भाजपा महिला शहर उपाध्यक्ष अश्विनी शिंदे, योगिता केदारी, वैशाली खामकर, सोनू भालेराव, विजय घोडके, नीलेश सुंभे यांच्यासह महिला उपस्थित होत्या. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाल, ‘‘केवळ आपल्याच बहिणीच्या नव्हे, तर समाजातील सर्व स्त्रियांच्या रक्षणाची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे. समाजात केवळ स्त्रियांचे भाऊ म्हणून रक्षण करणे पुरेसे नाही, तर समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. या घडीला समाजात स्त्री-पुरुष समानता मानणे, स्त्रीचा आदर करणे तसेच सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी व्यापक स्वरुपात जनजागृती होणे गरजेचे आहे.’’
थेरगाव येथे पीएमपी, एसटी बसला राखी
वाकड : येथील थेरगाव सोशल फाउंडेशनतर्फे एसटी व पीएमपी बसला राखी बांधून तिच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली. समाजात कधी तेढ निर्माण होते, दंगली होतात तेव्हा या बसला लक्ष्य केले जाते. अशा वेळेस बसचे मोठे नुकसान होते. त्यामुळे टीएसएफने अनोखे पाऊल उचलत तिच्या रक्षणाच्या जबाबदारीची शपथ घेतली. डांगे चौकात हे अनोखे रक्षाबंधन साजरे झाले.