शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे; शिक्षण विभागाची उदासीनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 02:40 AM2018-10-31T02:40:36+5:302018-10-31T02:41:03+5:30
माध्यमिक विभागातील शाळेत सीसीटीव्हीचा नाही पत्ता
पिंपरी : शाळेमध्ये मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले आहेत. अनेकदा शिक्षकांकडूनच विद्यार्थ्यांना गंभीर स्वरूपाची मारहाण केली जाते. या सर्व गोष्टींवर वचक ठेवण्यासाठी शाळांमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्याची आवश्यकता आहे. मात्र, शहरातील महापालिकेच्या माध्यमिक विभागातील शाळा अजूनही ‘सीसीटीव्ही’च्या प्रतीक्षेत आहेत. महापालिकेच्या प्राथमिक विभागातील शाळांमध्ये मागील वर्षी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची काही ठिकाणी दुरवस्था झाली आहे. यामुळे, शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. मात्र, शहरात गेल्या काही दिवसांत खासगी व महापालिका शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार सुरू आहेत. तसेच शिक्षकांनी विद्यार्थिनीला केलेल्या गंभीर मारहाणीची घटना ताजी आहे. या विकृत घटना वाढत असून, त्या रोखण्यासाठी शाळांच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे. त्यामुळे अशा विकृती करणाºयांवर वचक बसेल. यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे होते. प्राथमिक विभागात ८७ शाळा असून, त्यासाठी ३५० हून अधिक कॅमेरे मागील वर्षी बसविण्यात आले होते. मात्र, काही शाळांमधील कॅमेरे नादुरुस्त असल्याने ते केवळ ‘शो पिस’ म्हणूनच शिल्लक आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मागील वर्षी बसवलेले कॅमेरे किमान चार वर्ष सुस्थितीत राहणे अपेक्षित होते. मात्र एकाच वर्षात कॅमेरे खराब झाल्याने तिसरा डोळा खरेदी करणाºयांवर कुणाचीच नजर नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विद्यार्थी उद्याचे भविष्य आहेत हे लक्षात घेऊन महापालिकेच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी भरघोस योजना जाहीर केल्या जातात. मात्र, याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. महापालिकेच्या विद्यार्थ्यांची वाढती पटसंख्या पाहता व सतत होत असलेल्या विकृत घटना रोखण्यासाठी शहरातील शाळांमध्ये किमान चार ते पाच कॅमेरे आवश्यक आहेत. मात्र, काही शाळांमध्ये कॅमेरे केवळ मुख्य प्रवेशद्वारावरच बसविण्यात आले आहेत.
शाळेत आपले मूल सुरक्षित आहे या विश्वासावर पालक पाल्याला शाळेमध्ये पाठवतात. मात्र शाळेतही मुलांसोबत अनेक विकृत घटना घडतात. मात्र शाळेतही मुलांना हवी ती सुरक्षा मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कॅमेºयांची नजर हवी आहे. सीसीटीव्ही कॅमेºयांचे फुटेज मध्यवर्ती कार्यालयात उपलब्ध असणे आवश्यक आहे.
शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. मात्र, शहरात गेल्या काही दिवसांत खासगी व महापालिका शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार सुरू आहेत. तसेच शिक्षकांनी विद्यार्थिनीला केलेल्या गंभीर मारहाणीची घटना ताजी आहे. या विकृत घटना वाढत असून, त्या रोखण्यासाठी शाळांच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे.
माध्यमिक विभागाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी विद्युत विभागाशी चर्चा करण्यात आलेली आहे. तसेच, यंदाच्या वर्षी अर्थसंकल्पात तरतूद नसल्याने कॅमेरे बसविण्यात आले नाहीत.
- पराग मुंढे, सहायक प्रशासन अधिकारी, पिं-चिं. महापालिका
प्राथमिक शाळेतील खराब झालेल्या सीसीटीव्ही बाबत चौकशी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवणे आवश्यक आहे. त्यानुसार तरतूद करून लवकरच कॅमेरे बसविण्यात येतील.’’
- प्रा. सोनाली गव्हाणे, सभापती,
शिक्षण समिती