"हृदयात राम आणि हाताला काम", हे आपलं हिंदुत्व; आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: January 21, 2024 04:16 PM2024-01-21T16:16:26+5:302024-01-21T16:57:06+5:30

आम्ही औरंगाबादचे संभाजीनगर केले, उस्मानाबादचे धाराशिव केले, पण कुठेही दंगली घडू दिल्या नाहीत.

Rama in the heart and work in the hands this is our Hinduism Aditya Thackeray spoke clearly | "हृदयात राम आणि हाताला काम", हे आपलं हिंदुत्व; आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले

"हृदयात राम आणि हाताला काम", हे आपलं हिंदुत्व; आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले

पिंपरी : अयोध्येत २२ जानेवारीला मोठा दिवस आहे. श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पण आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे. "हृदयात राम आणि हाताला काम" हे आपलं हिंदुत्व असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे.  शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाची महान्याय सभा पिंपरीत झाली. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी राज्य संघटक एकनाथ पवार, मावळ लाेकसभा मतदार संघाचे संघटक संजाेग वाघेरे पाटील, पुणे जिल्हाप्रमुख ॲड. गाैतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शहर संघटक संतोष वाळके, जिल्हा उपसंघटिका वैशाली मराठे, युवा सेना अधिकारी चेतन पवार, माजी नगरसेवक मीनल यादव आदी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत. सत्तेत आलो की पहिल्याच बैठकीत आरक्षण मिळवून देऊ म्हणाले होते. रोजगार मिळवून देऊ म्हणाले, महागाई संपवू म्हणाले होते. पण आता काय सुरु तर सत्तर वर्षांपूर्वी त्यांनी काय केले होते? आता किती वर्षे तेच तेच उकरून काढणार आहेत. आम्ही औरंगाबादचे संभाजीनगर केले, उस्मानाबादचे धाराशिव केले, पण कुठेही दंगली घडू दिल्या नाहीत.  

खरे देशद्रोही कोण?

ठाकरे म्हणाले, चाळीस गद्दार जसे सुरतेला पळाले, तसेच सगळं त्यांच्या आवडत्या राज्यात जातेय, म्हणजे कुठे तर गुजरातला जातेय. आता तर वर्ल्ड कपची फायनल पण गुजरातला नेली. आता हीच फायनल मुंबईला झाली असती तर आपण नक्कीच जिंकलो असतो. मात्र फक्त स्वतःच्या प्रसिद्धी साठी हे सगळा खटाटोप सुरु आहे. वेदांता फॉक्सकॉन कंपनी आता गुजरात मध्ये ही होणार नाही. त्यांनी करार रद्द केला, कारण तिथे कंपनी उभारायला सात वर्षे लागणार होते, त्यामुळे त्यांनी देशातूनच हद्दपार व्हायचा निर्णय घेतला. म्हणजे गुजरातचे भले करण्याच्या नादात देशाचे नुकसान झाले. आता सांगा, मग खरे देशद्रोही कोण आहेत? असे म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

पेपरफुटी करणाऱ्यांना फाशी द्या..

ठाकरे म्हणाले, देशात फक्त महाराष्ट्रावर अन्याय केला जातोय. यासाठी नवे कलम आणले आहे. पण महाराष्ट्राने किती दिवस अन्याय सहन करायचा. आता तुम्ही पुन्हा या मिंदे सरकारला सत्तेत आणले तर ते आपले मंत्रालय ही गुजरातला पळवतील. तलाठी भरती घोटाळा पुढे आला. घोटाळा झाला ते झाला, २०० पैकी २१४ मार्क मिळाले. ज्याला एक खाते चालवता येत नाही त्याला घटनाबाह्य मुख्यमंत्री बनवले, असा झालाय हा घोटाळा. आता पेपटफुटी करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देऊ, असा कायदा आणावा, असेही त्यांनी म्हटले.

Web Title: Rama in the heart and work in the hands this is our Hinduism Aditya Thackeray spoke clearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.