मावळातून रमेश साळवे हद्दपार
By Admin | Published: April 10, 2017 02:38 AM2017-04-10T02:38:26+5:302017-04-10T02:38:26+5:30
स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश रामचंद्र साळवे व त्यांचा पुतण्या किरण रतन साळवे यांना मावळ
लोणावळा : स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश रामचंद्र साळवे व त्यांचा पुतण्या किरण रतन साळवे यांना मावळ तालुक्यातून ५ ते २८ एप्रिल २०१७ असे २४ दिवस हद्दपार करण्यात आले असल्याचा आदेश मावळचे प्रांताधिकारी सुभाष भागडे यांनी तीन एप्रिल रोजी पारित केला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कारणावरून २८ फेब्रुवारी रोजी रात्री ११च्या सुमारास कुसगाव हद्दीत शिंदे हॉस्पिटलजवळ ओळकाईवाडी येथे रमेश साळवे व किरण साळवे यांनी गैरकायदा मंडळी जमवून भांडण करुन फिर्यादीला हातातील हत्यारे व लाथा-बुक्क्यांनी मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ, दमदाटी केली. यामुळे कुसगाव हद्दीत सर्वसामान्यांमध्ये दहशत व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्याकडून भविष्यात भांडण-तंटा होण्याची दाट शक्यता असल्याने कुसगावात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ
शकतो. म्हणून त्यांना पुढील २८ दिवसांकरिता मावळ तालुक्यातून हद्दपार करण्यात यावे,असा प्रस्ताव लोणावळा ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप येडे पाटील यांनी सादर केला होता. (वार्ताहर)