रामकृष्ण मोरे नाट्यगृहाने टाकली कात;अत्याधुनिक ध्वनियंत्रणा, प्रकाश योजना, अग्निशामक अन् इमारतीचे नूतनीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 06:56 AM2018-08-02T06:56:05+5:302018-08-02T06:56:15+5:30
मराठी नाटक, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लोकप्रिय असणाऱ्या चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाने कात टाकली आहे. अत्याधुनिक ध्वनियंत्रणा, डोळे दिपविणारी प्रकाश योजना, लँडस्केपिंग, अग्निशामक यंत्रणा नूतनीकरण करण्यात येणार असून, ३२० केव्ही क्षमतेच्या सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे.
- विश्वास मोरे
पिंपरी : मराठी नाटक, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लोकप्रिय असणाऱ्या चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाने कात टाकली आहे. अत्याधुनिक ध्वनियंत्रणा, डोळे दिपविणारी प्रकाश योजना, लँडस्केपिंग, अग्निशामक यंत्रणा नूतनीकरण करण्यात येणार असून, ३२० केव्ही क्षमतेच्या सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह म्हटले, की मराठी रंगभूमी आणि चित्रपट कलावंतांचे, संगीतकारांचे आवडते ठिकाण. या रंगभूमीवरून घडलो, असे प्रशांत दामले, अंकुश चौधरी, भरत जाधव, संजय नार्वेकर, प्रियंका यादव, सोनाली कुलकर्णीपासून, तर मुक्ता बर्वे हे कलावंत आवर्जुन सांगत असतात. सही रे सही, छत्रपती शिवाजी राजा आदी नाटकांचा शुभारंभही याच नाट्यगृहातून झाला आहे. सन १९९६ मध्ये तत्कालीन सांस्कृतिक मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या संकल्पनेतून नाट्यगृहांची निर्मिती झाली. त्यास पिंपरी-चिंचवड प्रेक्षागृह असे नाव देण्यात आले होते. प्रा. मोरे यांच्या निधनानंतर या नाट्यगृहास प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह असे नामकरण करण्यात आले. गेल्या वीस वर्षांत हे नाट्यगृह शहराची ओळख बनले आहे.
नाट्यगृहात मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक, प्रायोगिक नाटके सादर होत असतात. तसेच विविध सांगीतिक कार्यक्रम, विविध संस्थांचे पुरस्कार वितरण सोहळेही या नाट्यगृहात होत असतात. अकराशे आसन क्षमतेचे नाट्यगृह आहे. कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर असल्याने येथील आसने, आतील स्वच्छतागृहे, वातानुकूलन यंत्रणा, कलाकारांना असणारी निवासाची सोय असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. रंगमंचाच्या खाली पावसाळ्यात पाणी साचत होते. रंगकर्मींनी याबाबत नाराजीही व्यक्त केली होती. लोकमतने याबाबत ‘समस्यांच्या गर्तेत नाट्यगृहे’ अशी मालिकाही केली होती. याची दखल घेऊन नाट्यगृहांचे नूतनीकरणाचा निर्णय झाला. नाट्यगृहाचा कायापालट करण्याचे काम सुरू आहे.
यासाठी एस. जे. बिल्डकॉन या संस्थेस काम दिले आहे, तर किमया ग्रुपचे वास्तुरचनाकार माणिक बुचडे आणि अनुप सातपुते यांनी आराखडा तयार केला आहे. यासाठी स्थापत्य कामांसाठी सव्वासात कोटी, विद्युत कामांसाठी सव्वाअकरा कोटी असा एकूण १८ कोटी ४८ लाख, २१ हजार ३५२ रुपये खर्च येणार आहे. सप्टेंबर महिन्यांपर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत आहे.
नाट्यगृहाच्या कामाचा वेग पाहता हे काम मुदतीत पूर्ण होईल की नाही याबाबत शंका आहे. नाट्यगृह लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी चिंचवड शहरातील रंगकर्मींनी केली आहे.
असा होणार बदल
इमारतीचे इलिव्हेशन बदलणे, प्रवेशद्वार बदलणे, अत्याधुनिक स्वच्छतागृह, सरावासाठी दालन तयार करणे, व्हीआयपीसाठी प्रवेशद्वार तयार करणे.
भिंतीचे इन्सुलेशन, पॅनलिंग बदलणे, आतील इंटेरियर बदलणे, पडदे बदलण्यात येणार तसेच परिसरात लॅण्डस्केपिंग करण्यात येणार आहे.
प्रकाशयोजना बदलण्यात येणार असून, फॉल सीलिंग आणि परिसरातील सर्व दिवे बदलण्यात येणार आहे. नव्याने वायरिंग करणे, पॅनलचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. रंगमंचीय प्रकाश योजना बदलण्यात येणार आहे. स्पेशल इफेक्ट लायटिंग करण्यात येणार आहे.
नवीन अत्याधुनिक व्हीआरव्ही प्रकारातील वातानुकूलन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. अग्निशामक यंत्रणा, जुने-गंजलेले पाइप बदलण्यात येणार असून, आॅटोमायझेशन करण्यात येणार आहे.
आंतरिक सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा, आॅडिओ-व्हिडीओ कॉन्फरसिंग यंत्रणा बसविणे, मेटल डिटेक्टर, बॉम्ब डिटेक्टर, एलईडी डिस्प्ले यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
वीज बचतीसाठीही प्रयत्न केले जाणार असून, इमारतीवर ३२० केव्ही क्षमतेचे पॉवर सोलर पॅनल बसविण्यात येणार आहे. त्यामुळे विजेची, तसेच त्यावर होणाºया दरमहा खर्चाची बचत होणार आहे.
प्रा. मोरे नाट्यगृहातील आंतर आणि बाह्यरचनेत बदल होणार आहेत. त्यामुळे नाट्यगृहाचा लूक बदलणार आहे. त्याचबरोबर नाट्यगृहातील स्वच्छतागृह, प्रकाश योजना, आसनव्यवस्था यातही बदल केले जाणार आहेत. वीज बचतीसाठीही सोलर पॅनल बसविले जाणार आहे. अत्याधुनिक सुविधांचा समावेश यात असणार असून, रसिक आणि कलावंत यांना डोळ्यासमोर ठेवून बदल केले आहेत. - प्रवीण तुपे, सह शहर अभियंता
नाट्यगृह ही शहराची ओळख आहे. त्यामुळे येथे येणाºया रसिकांना आणि रंगकर्मींना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. नुतनीकरणामुळे नाट्यगृहाचा लूक बदलला आहे. त्याचबरोबर आंतरिक सुरक्षेसाठी सीसीटिव्ही यंत्रणा, रंगमंचीय प्रकाश योजना, ध्वनीयंत्रणा बदलण्यात येणार आहे. रसिकांना कार्यक़माचा अधिक चांगल्या पदधतीने आस्वाद घेता येणार आहे. - माणिक बुचडे, वास्तू रचनाकार