Pimpri Chinchwad: नदीत राडारोडा टाकणे महागात, नऊ वाहनांवर कारवाई
By विश्वास मोरे | Published: March 28, 2024 04:00 PM2024-03-28T16:00:53+5:302024-03-28T16:01:10+5:30
सापळा रचून नऊ वाहनांवर कारवाई करून सव्वा लाखांचा दंड वसूल केला आहे....
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीत राडारोडा टाकला जात आहे, याबाबत लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानुसार शहरातील नद्यांच्या कडेला तसेच नद्यांमध्ये राडारोडा टाकणारी वाहने आणि वाहनचालकांवर पर्यावरण विभागाने दंडात्मक कारवाई करण्यात आली. सापळा रचून नऊ वाहनांवर कारवाई केली. सव्वा लाखांचा दंड वसूल केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातून मुळा, पवना आणि इंद्रायणी नद्या वाहतात. या नद्यांच्या कडेला राडारोडा टाकत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे केल्या आहेत. तसेच लोकमतनेही वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत महापालिकेच्या पर्यावरण विभागाने प्रत्यक्ष पाहणी केली. सापळा रचून नऊ वाहनांवर कारवाई केली. सव्वा लाखांचा दंड वसूल केला आहे.
ट्रक, ट्रॅक्टर, डंपर, टेम्पोवर कारवाई
शहरातील विविध भागांत दररोज ट्रक, ट्रॅक्टर, डंपर, टेम्पो तसेच आर.एम.सी.प्लॅन्टच्या मिक्सर गाड्या अशा वाहनांतून नदीच्या कडेला राडारोडा टाकण्यात येत होता. यामध्ये वाहनचालक शिवा राठोड (वाहन क्र.के.ए.३३/टी.बी.२३२२), उमेश बारणे (वाहन क्र.एम.एच.१४/जे.एल.९०८५), वेदांत देसाई (वाहन क्र.के.ए.३३/के.ए.२१०५), आर.डी.वाघोले (वाहन क्र.एम.एच.१४/डी.एम.६४३२, एम.एच.१२/टी.एल.०८७२), तेजस उक्के (वाहन क्र.एम.एच.२०/सी.आर.२१९१,/एम.एच.१४/एल.ए.८३२८), प्रकाश चौधरी (वाहन क्र. एम.एच.१२/क्यु.डब्ल्यु.११४१), कांतीलाल खिरु पवार (वाहन क्र. एम.एच.१४/बी.एम.९८२) अशी एकूण ९ वाहने पकडून त्यांच्याकडून सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
या पथकाने केली कारवाई
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे, गोरक्षनाथ करपे, स्वप्निल पाटील, पुष्पराज भागवत, प्रदीप महाले, जगन्नाथ काटे, बाबासाहेब ढोकळे तसेच महाराष्ट्र सुरक्षा दल, मेस्को जवानांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
नदीपात्रात भराव टाकल्यामुळे नदीपात्र अरूंद होत असून तसेच नदीप्रदूषण देखील होत आहे. त्यामुळे यापुढे नदीपात्रात भराव टाकणाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या कारवाईसाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने स्वतंत्र पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. नदीमध्ये भराव टाकणाऱ्या जागामालक, गाडी मालक, वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच वाहनेही जप्त करण्यात येतील, याची नोंद सबंधितांनी घ्यावी.
-संजय कुलकर्णी (सह शहर अभियंता, महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभाग)