मावळातील रानमेवा होतोय दुर्मिळ
By admin | Published: April 25, 2017 04:06 AM2017-04-25T04:06:24+5:302017-04-25T04:06:24+5:30
गेली काही वर्षांत ग्रामीण भागातून रानमेवा खूप कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. बोर, करवंद , आंबोळी, तुती, भोकरसारखी झाडे दुर्मिळ
उर्से : गेली काही वर्षांत ग्रामीण भागातून रानमेवा खूप कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. बोर, करवंद , आंबोळी, तुती, भोकरसारखी झाडे दुर्मिळ झाली आहेत. डोंगरावर एखादे झाड करवंदाचे दिसत आहे. लहान मुलांचे अतिशय आवडीचे हे फळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
डोंगर भागातील वाढलेली वृक्षतोड याला कारणीभूत ठरत आहे. थोड्या फार प्रमाणात यांची डोंगरची काळी मैना (करवंद) चाखायला मिळत आहे. १५-२० वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात आंबट-गोड बोरे, करवंद, आंबोळी, तुती यांची रेलचेल कुठे बाजारात, चौकात, गल्लोगल्ली व शाळेच्या बाहेर दिसायची. रेल्वे, एसटी स्टॅँड, रस्त्याच्या कडेला किंवा घरोघरी महिला डोक्यावर टोपली घेऊन विकताना दिसायचे. मात्र, आता रानमेवा विक्रेतेही फारसे दिसत नाहीत.
मावळचे वैशिष्ट्ये असलेल्या रानमेव्यांच्या विविध वृक्षांचे संवर्धन करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. सध्या थोड्या फार प्रमाणात डोंगराळ भागात या रानमेव्याचा बहर दिसत आहे. कातकरी, ठाकर समाजातील महिला कष्ठपूर्वक डोंगरभागात जाऊन या करवंदाची काढणी करतात. करवंदाच्या जाळीतील काट्यामुळे हाताला खरचटते. अजून पुरेशा प्रमाणात करवंद उपलब्ध नाहीत. झाडे, जाळ्या कमी झाल्याने गावाकडच्या मुलांनाही आता करवंद, तुती व आंबोळी काय हे समजावून सांगावे लागते. (वार्ताहर)