स्पा सेंटरमधील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळली खंडणी, पिंपरी-चिंचवडमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 12:36 PM2022-03-10T12:36:52+5:302022-03-10T12:41:29+5:30
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मागितली खंडणी...
पिंपरी : स्पा व मसाज सेंटरमध्ये एकाने पोलीस असल्याचे सांगून घाईघाईने ओळखपत्र दाखवले. कारवाई व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागितली. हा प्रकार २७ फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडला.
विशाल कैलास जोंजळे, असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राहुल अनिल कदम (वय २४, रा. सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक, पुणे) यांनी बुधवारी (दि. ९) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मी पोलीस आहे, असे सांगून आरोपीने फिर्यादीला घाईघाईने ओळखपत्र दाखविले. स्पा मसाज सेंटरमध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत कार्यवाही न करण्यासाठी तीस हजार रुपये रोख रकमेची मागणी केली. पैसे न दिल्यास त्याच्याकडे असलेले व्हिडिओ शूटिंग व्हायरल करून फिर्यादी काम करत असलेल्या स्पा मसाज सेंटरची व स्पा मसाज सेंटरमध्ये काम करणाऱ्या मुलींची बदनामी करेन, असे आरोपीने सांगितले.
त्यानंतर फिर्यादीकडून पाच हजार रुपये रोख रक्कम घेऊन उर्वरित २५ हजार रुपयांची मागणी आरोपीने केली. पैसे दिले नाही तर पोलिसांना सांगून कारवाई करण्याची व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने खंडणी मागितली, असे फिर्यादीत नमूद आहे.