'स्पा' सर्व्हिसेसच्या बहाण्याने जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून उकळली खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 08:13 PM2022-05-31T20:13:02+5:302022-05-31T20:13:09+5:30
हिंजवडी पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल
पिंपरी : ‘स्पा’ सर्व्हिसेस देण्याच्या बहाण्याने पुणे जिल्हा परिषदेच्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याकडून चार हजारांची खंडणी उकळली. तसेच आणखी पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास मुलीचे आणि वैद्यकीय अधिकाऱ्याचे माॅर्फ केलेले न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी पाच ते रविवारी (दि. २९) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.
श्वेता सिंग (वय २१, रा. हलियापूर, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्यासह जितेंद्रकुमार आणि गुगल पेवरून पैशांची मागणी करून धमकी देणाऱ्या एका इसमाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. डाॅक्टर असलेल्या ४६ वर्षीय व्यक्तीने याप्रकरणी सोमवारी (दि. ३०) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे डाॅक्टर असून, पुणे जिल्हा परिषदेत वैद्यकीय अधिकारी म्हणून ते सेवेत आहेत. ‘स्पा’ सर्व्हिसेसबाबत फिर्यादीने ऑनलईन ‘सर्च’ केले. त्यावेळी सुलेखा डाॅटकाॅम स्पा ॲण्ड ब्युटी सर्व्हिसेस ॲट होम ही वेबसाईटवर त्यांनी चौकशी केली. त्यावेळी आरोपी जितेंद्रकुमार याने सर्व्हिसेस देण्याच्या बहाण्याने रोख रकमेची मागणी केली. फिर्यादी पैसे देत नसल्याने त्याने धमकी दिली. फिर्यादी व फिर्यादीची मुलगी हिचे न्यूड फोटो माॅर्फ करून ते फोटो एस्काॅर्ट साईड पे भेज दूंगा, अशी धमकी आरोपीने दिली. त्यानंतर आरोपीने ते फोटो फिर्यादीच्या व्हाटसअपला पाठवून फिर्यादीकडे १० हजार रुपयांची मागणी केली. फिर्यादीकडून गुगल पेव्दारे चार हजार ट्रान्सफर करून घेऊन फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस निरीक्षक सुनील दहिफळे तपास करीत आहेत.
फोन नंबर ब्लाॅक केल्यानंतरही धमकी
फिर्यादीने आरोपींचे नंबर ब्लाॅक केल्यानंतर आरोपी हे दुसऱ्या नंबरवरून फोन करीत होते. तसेच सातत्याने पैशांची मागणी करीत होते. त्यामुळे फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी महिला आरोपीला अटक केली. तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.