साईटवर मटेरिअल टाकण्यासाठी मागितली खंडणी; पैसे न दिल्यास गाड्या फोडण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 03:51 PM2021-09-12T15:51:56+5:302021-09-12T15:52:06+5:30
तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
पिंपरी : साईटवर मटेरिअल टाकण्यासाठी खंडणी मागितली. पैसे न दिल्यास गाड्या फोडण्याची व साईटवर येऊ न देण्याची धमकी दिली. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. काळजेवाडी, चऱ्होली बुद्रुक येथे मागील पाच महिन्यापासून ते १० सप्टेंबर २०२१ या कालावधीत ही घटना घडली.
सत्यवान ज्ञानेश्वर तापकीर (वय ४६), आकाश सत्यवान तापकीर (वय २५) आणि सागर सत्यवान तापकीर (वय २३, तिघेही रा. काळजेवाडी, चऱ्होली), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मनोज नरेश गुप्ता (वय ४४, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी शनिवारी (दि. ११) दिघी पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता यांची आवनी आवास नावाची काळजेवाडी, चऱ्होली येथे साईट सुरू आहे. या साईटवर येऊन आरएमसी कॉन्ट्रक्टर चव्हाण यांना आरोपी सागर तापकीर यानं साईटवर येऊन मटेरियल टाकण्यासाठी ५० हजार रुपयांची खंडणी मागणून ४५ हजार रुपये धमकावून घेतलं. काँक्रीटचे काम करणारे हरीश पटेल यांना आरोपी आकाश तापकीर याने धमकावून ३० हजार रुपये घेतले. तसेच आरोपी सत्यवान तापकीर याने १० सप्टेंबर रोजी हरीश यांना फोन करून एक लाख रुपये खंडणीची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास गाड्या फोडण्याची व साईटवर येऊ न देण्याची धमकी दिली.