खंडणीचा गुन्हा; दोन पोलीस निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 02:28 AM2018-12-02T02:28:11+5:302018-12-02T02:28:13+5:30
मोबाइल टॉवरच्या बॅटरी चोरल्याच्या संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून साडेआठ लाख रुपये खंडणी उकळली.
पिंपरी : मोबाइल टॉवरच्या बॅटरी चोरल्याच्या संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून साडेआठ लाख रुपये खंडणी उकळली. गुन्हा दाखल न करता आरोपींना सोडून दिले. त्यामुळे गुन्हे शाखेचे सहायक फौजदार
रमेश नाळे तसेच लेखनिक राजू केदारी या दोघांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
भंगार मालाच्या व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या सुमित यादव, अब्दुल खान, वसीम खान, अनुकुमार खान या कामगारांना चोरीप्रकरणी चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. बेदम मारहाण केली, विजेचा शॉक दिला. गुन्हा दाखल न करता, सोडून देण्यासाठी दहा लाखांची मागणी केली. भंगार दुकानाचे मालक इस्तीयाक ऊर्फ मुस्ताक महलू खान यांच्याकडून साडेपाच लाख आणि त्यांचे भागीदार धनराज अकोदिया यांच्याकडून तीन लाख रुपये अशी साडेआठ लाख रुपयांची रक्कम उकळली.
याप्रकरणी भंगार दुकानाचे मालक इस्तीयाक ऊर्फ मुस्ताक महलू खान यांनी खंडणी घेणाºया पोलिसांविरुद्ध तक्रार दिली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या आदेशानुसार दोन पोलीस अधिकाºयांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.