सिगारेटचे पैसे मागितल्यावर, आम्ही रावण गँगची मुले आहोत म्हणत टपरीचालकावर कोयत्याने वार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 05:04 PM2021-10-14T17:04:29+5:302021-10-14T17:13:33+5:30
तंबाखू व सिगारेटचे पैसे मागितले असता कोयत्याने वार करून टपरीचालकाला जखमी केले. तू आम्हाला ओळखत नाही का. आम्ही इथले भाई आहोत. आम्ही रावण गॅंगची मुले आहोत, असे म्हणत तिघांनी पैसे देण्यास नकार दिला
पिंपरी : तंबाखू व सिगारेटचे पैसे मागितले असता कोयत्याने वार करून टपरीचालकाला जखमी केले. तू आम्हाला ओळखत नाही का. आम्ही इथले भाई आहोत. आम्ही रावण गॅंगची मुले आहोत, असे म्हणत तिघांनी पैसे देण्यास नकार दिला. कासारवाडी रेल्वे स्टेशनच्या मागे बुधवारी (दि. १३) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. तुषार संतोष धेंडे (वय १८, रा. कासारवाडी) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. १३) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मुक्तार तांबोळी (वय २३), आतिष उर्फ बंटी गावडे (वय २२), बसुराज यमनाप्पा धोतरे (वय २०, सर्व रा. कासारवाडी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मुक्तार तांबोळी याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या आतेभावाची कासारवाडी रेल्वे स्टेशनच्या पाठीमागे पान टपरी आहे. आरोपींनी टपरीमधून २०० रुपयांची तंबाखू आणि सिगारेट खरेदी केली. फिर्यादीने आरोपींना पैसे मागितले. तू आम्हाला ओळखत नाही का. आम्ही इथले भाई आहेत. आम्ही रावण गॅंगची मुले आहोत, असे म्हणत आरोपींनी फिर्यादला पैसे देण्यास नकार दिला.
मी गरीब आहे. माझे पैसे देऊन टाका, असे फिर्यादीने सांगितले असता आरोपी आतिष याने गचांडी पकडून फिर्यादीला टपरीच्या बाहेर ओढले. आरोपी मुक्तार आणि बसुराज या दोघांनी हाताने मारहाण केली. मुक्तार आणि आणि आतिष यांनी कमरेचा कोयता काढून फिर्यादीच्या हातावर वार करून जखमी केले. त्यामुळे फिर्यादीने रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडे मदत मागितली. तुझ्या मदतीला कोण येते तेच पाहतो, असे म्हणत आरोपींनी आरडाओरडा करून दहशत निर्माण केली. आरोपींनी टपरी मधून ४०० रुपये जबरदस्तीने चोरून नेले. फिर्यादीने आरोपींच्या तावडीतून सुटून पळ काढला असता आरोपी बासुराज याने दगड व विटांनी मारून फिर्यादी यांना दुखापत केली.