बंडाचा झेंडा

By admin | Published: September 29, 2014 05:38 AM2014-09-29T05:38:32+5:302014-09-29T05:38:32+5:30

शिवसेना- भाजप युती आणि कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी फुटल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीत पुणे जिल्ह्यात पक्षांतराची लाटच आली.

Rebellion Flag | बंडाचा झेंडा

बंडाचा झेंडा

Next

पुणे , - शिवसेना- भाजप युती आणि कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी फुटल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीत पुणे जिल्ह्यात पक्षांतराची लाटच आली. अनेक इच्छुकांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करून उमेदवारी अर्ज भरले किंवा बंडखोरी केली आहे. पुण्याचे माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी कॉँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून उमेदवारी अर्ज भरला. गेल्या वेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून लढलेले सचिन तावरे यांनी शिवसेनेची उमेदवारी मिळविली आहे. शिवसेनेचे माजी आमदार राहिलेले शरद ढमाले यांनी ऐन वेळी भाजपामध्ये प्रवेश करून भोरमधून उमेदवारी मिळविली आहे़ भाजपाकडून नगरसेवक झालेल्या मिलिंद एकबोटे यांनी शिवाजीनगरमधून शिवसेनेकडून उमेदवारी मिळविली़ आंबेगाव मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांचे एके काळचे खंदे समर्थक जयसिंग एरंडे यांनी भाजपामध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळविली. तर जुन्नरमध्ये शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य नेताजी डोके यांनी भाजपाची उमेदवारी घेतली आहे. शिवाजीनगर मतदारसंघातून काँग्रेसचे नगरसेवक दत्ता बहिरट यांनी बंडखोरी केली.
महायुती आणि आघाडी तुटल्याने दर निवडणुकीत आपल्याला पसंत नसलेल्या आपल्याच पक्षातील किंवा मित्र पक्षातील उमेदवाराला आतून विरोध करण्याऐवजी यंदा इच्छुकांना थेट लढण्याची संधी मिळाली आहे़ त्यामुळे एका पक्षाने संधी नाकारताच थेट दुसऱ्याच्या दारात जाऊन तिकीट मिळविण्याची शर्यत आज शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होती़
ढमाले भाजपामध्ये
शिवसेनेतून मुळशी मतदारसंघातून पूर्वी आमदार झालेले शरद ढमाले यांनी तिकीट मिळत नसल्याचे समजताच पक्षांतर करत भाजपाचे तिकीट मिळवून रिंगणात उडी घेतली आहे़ यामुळे चिडलेल्या शिवसैनिकांनी ढमाले यांच्या गाडीवर दगडफेक करून काचा फोडल्या़
शिवाजीनगरमध्ये घोळ
शिवाजीनगर मतदारसंघातून भाजपाचे तिकीट कोणाला मिळणार, याची मोठी चर्चा होती़ आयात उमेदवार नको, घराणेशाही नको, अशी भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी वेळोवेळी मागणी केली होती़ काल शहरातील उमेदवारांची यादी जाहीर झाली, तरी त्यात शिवाजीनगरमधील उमेदवाराचे नाव नव्हते़ शेवटी नेत्यांनी कार्यकर्त्यांवर आयात उमेदवार
दिला आहे़
आज सकाळी काँग्रेसमधून ऐन वेळी पक्षात आलेल्या दत्ता बहिरट यांना उमेदवारी जाहीर झाली. तुम्हाला ए, बी फॉर्म द्यायची व्यवस्था करतो, असे सांगण्यात आले़ त्यानुसार मिरवणूक काढून ते अर्ज भरण्यासाठी मध्यवर्ती इमारतीत गेले़ तोपर्यंत पुन्हा चक्रे फिरली़ खासदार अनिल शिरोळे यांनी आपला मुलगा सिद्धार्थला उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रह धरला होता़ त्याला देत नसाल, तर मग पक्षातील कोणालाही द्या, असे त्यांनी सांगितले़ तेव्हा विजय काळे यांना तिकीट देण्यात आले़ अर्ज भरत असताना दत्ता बहिरट यांना ही बाब समजली़ त्यांच्या पाठोपाठ विजय काळे यांनी येऊन भाजपाकडून अर्ज दाखल केला़
भाजपाचे जुने कार्यकर्ते व नेहमीच वादग्रस्त ठरलेले मिलिंद एकबोटे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेची कास धरली आणि शिवाजीनगरमधून सेनेची उमेदवारी मिळविली़ दुसरीकडे दत्ता बहिरट आणि माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरून बंडखोरी केली आहे़
तावरे शिवसेनेत
गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले व यंदाही इच्छुक असलेल्या सचिन तावरे यांनी अगोदरपासून अपक्ष म्हणून लढण्याची तयारी केली होती़ युती तुटल्याने त्यांनी शिवसेनेकडे धाव घेतली़ शिवसेनेनेही साथ देत त्यांना पर्वतीमधून उमेदवारी बहाल केली़
उमेदवारी मिळूनही नाकारली
‘हडपसर मतदारसंघ पुणे शहर लोकसभा मतदारसंघात येत नाही. या विधानसभा मतदारसंघाशी माझा
काय संबंध?’ असे म्हणत कॉँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे
यांनी पक्षाने उमेदवारी दिली
असली, तरी ती नाकारली. मात्र, पक्षाविषयी नाराज नसल्याचेही
त्यांनी स्पष्ट केले. व्यवहारे
पुण्याच्या पहिल्या महिला
महापौर आहेत. त्यांनी कसबा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना कसब्याऐवजी हडपसरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Rebellion Flag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.