मंदीचा फटका टाटा माेटर्सला ; चिखली प्रकल्पात आठ दिवस उत्पादन बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 09:07 PM2019-08-26T21:07:11+5:302019-08-26T21:09:34+5:30
मंदीचा फटका आता पुण्यातील टाटा माेटर्सला देखील बसला आहे. कंपनीत दाेन टप्प्यांमध्ये आठ दिवस ब्लाॅक क्लाेजर जाहीर करण्यात आला आहे.
पिंपरी : औद्योगिक मंदिचा फटका शहरातही बसू लागला आहे. जगाच्या नकाशावर उद्योगनगरी म्हणून लौकीक असणाऱ्या टाटा मोटर्स कंपनीच्या चिखली प्रकल्पात ब्लॉक क्लोजर जाहीर केला आहे. दिनांक २८ ते ३१ ऑगस्ट आणि ३ ते ६ सप्टेंबर अशा दोन टप्प्यात कार विभागात आठ दिवस ब्लॉक क्लोजर आहे.
वाहनांच्या विक्रीत गेल्या काही महिन्यांपासून घट होत असून त्याचा मोठा फटका वाहन निर्मात्यांसह, पुणे आणि पिंपरी-चिंचवड पट्टयातील वाहन उद्योगांशी संलग्न लघुउद्योग क्षेत्रालाही बसत आहे. वाहन उद्योगातील मंदीमुळे या औद्योगिक पट्टयातील लघुउद्योगांना मिळणारे काम कमी झाले आहे. औद्योगिकनगरीची शान असणाऱ्या टाटा मोटर्सलाही मंदिची झळ जाणवत आहे. एप्रिल, मे आणि जून या पहिल्या तिमाहीतच मोठया प्रमाणात तूट झाल्याचे कंपनीने घोषित केले आहे. टाटा मोटर्सवर हजारो कामगार आणि शेकडो लघुउद्योग अवलंबून आहेत.
काही दिवसांपूर्वी ३० मेपासून २९ जूनपर्यंत आणि ५ ते १० ऑगस्ट असा ब्लॉक क्लोजर केला होता. तसेच पिंपरी प्रकल्पात (जे ब्लॉक) एक ते तीन ऑगस्ट दरम्यान चार दिवसांचा ब्लॉक क्लोजर घेण्यात आला. गणेशोत्सवाच्या तोंडावर कंपनीने आठ दिवसांचा ब्लॉक क्लोजर जाहीर केला आहे.