आपली कर्तव्ये ओळखावीत - स्वामी स्वरूपानंद सरस्वती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 03:31 AM2017-11-28T03:31:58+5:302017-11-28T03:32:02+5:30
प्रत्येक माणसाने आपली कर्तव्ये ओळखली पाहिजेत. परंतु माणसाला आपली कर्तव्ये लक्षात येत नाहीत, कारण माणूस इतरांच्या चुका काढण्यात आपले जीवन वाया घालवत आहे.
चिंचवड : प्रत्येक माणसाने आपली कर्तव्ये ओळखली पाहिजेत. परंतु माणसाला आपली कर्तव्ये लक्षात येत नाहीत, कारण माणूस इतरांच्या चुका काढण्यात आपले जीवन वाया घालवत आहे. आपले निरीक्षण करण्याऐवजी केवळ इतरांचेच निरीक्षण करण्यात आपले जीवन वाया जात असल्याचे मत स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी व्यक्त केले.
श्रीमान महासाधू श्री मोरया गोसावी यांचा ४५६ वा संजीवन समाधी महोत्सव सोमवारी चिंचवड येथे श्री मोरया गोसावी समाधी मंदिर पटांगणावर (देऊळमळा) येथे उत्साहात सुरू झाला. समाधी सोहळ्याचे उद्घाटन परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.
समाधी महोत्सव सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी खासदार श्रीरंग अप्पा बारणे, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार जगन्नाथ देवमहाराज, विश्वस्त विश्राम देव, आनंद तांबे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, नगरसेवक सुरेश भोईर, गजानन चिंचवडे, उद्योगपती माऊली घोगरे, सहायक अधिकारी संदीप खोत आदी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांनी उद्घाटन सोहळ्यापूर्वी मोरया गोसावी मंदिरास भेट दिली.
महासाधू मोरया गोसावी यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त ट्रस्टतर्फे तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे कार्यक्रमावेळी प्रकाशन करण्यात आले. या १२ दिवसांच्या समाधी महोत्सव सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम, होम हवन, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिर, प्रवचन, भजन व मराठी सुगम संगीताचे कार्यक्रम होणार आहेत. सुप्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर, जितेंद्र अभ्यंकर, आनंद भाटे, तौफिक कुरेशी यांचे गायन व वादनाचे कार्यक्रम होणार आहेत.
खासदार श्रीरंग बारणे यांनी समाधी सोहळ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, विनोद पवार व नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनीही उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन डॉ. चारुदत्त देशपांडे यांनी तर प्रास्ताविक विश्वस्त विशाल देव यांनी केले, तर आभार विश्वस्त आनंद तांबे यांनी व्यक्त केले.
विचाराच्या कक्षा : प्रेरणेतून श्रद्धा येते
स्वामी स्वरूपानंद सरस्वती म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक गोष्टीबाबत प्रेरणा असते. त्याच प्रेरणेतून श्रद्धा येते. आपले जीवन घडविण्यामध्ये बºयाच लोकांचा सहभाग असतो, त्या सर्वांबद्दल असणारी आदराची भावनादेखील श्रद्धाच असते. ही श्रद्धा म्हणजेच परमेश्वराचे अस्तित्व आहे. संकुचित विचार करण्याची प्रवृत्ती मानवी विकासासाठी घातक आहे़ त्यामुळे विचारांच्या कक्षा विस्तृत करायला हव्यात. जी व्यक्ती केवळ भौतिक सुख आणि वासनेसाठी जगते अशा व्यक्तीमध्ये आणि पशुंमध्ये काहीही फरक नसतो. पशुंपेक्षा वेगळी शक्ती निसर्गाने आपल्याला दिली आहे. त्या विचारशक्तीने सद्विवेकाचा विचार करून जीवनाचे सार्थक करायला हवे.