वाकड पोलिसांचा 'मुळशी पॅटर्न'! दहशत कमी करण्यासाठी मुंडन करून गुन्हेगारांची काढली धिंड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 07:16 PM2020-11-02T19:16:35+5:302020-11-02T19:19:06+5:30
दगड आणि कोयत्याने तोडफोड करून आणि जीवघेणा हल्ला करत टोळक्याने रहाटणी परिसरात शुक्रवारी धुडगुस घातला होता.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस फोफावत चाललेल्या गुन्हेगारीमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. दगड आणि कोयत्याने तोडफोड करून जीवघेणा हल्ला करून टोळक्याने रहाटणी परिसरात शुक्रवारी (दि. ३०) धुडगुस घातला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना जेरबंद करण्यात आले. तसेच सर्वसामान्यांमधील त्यांची दहशत मोडून काढण्यासाठी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे मुंडन करून वाकड पोलिसांनी धिंड काढली.
शुभम निवृत्ती कवठेकर (वय २३, रा. बिबवेवाडी, पुणे), दीपक नाथा मिसाळ (वय २३), मंगेश मोतीराम सपकाळ (वय २३, दोन्ही रा. काळेवाडी), कैलास हरिभाऊ वंजाळी (वय १९), सनी गौतम गवारे (वय १९, दोघे रा. रहाटणी फाटा), आकाश माधव कांबळे (वय २२, रा. रहाटणी) अशी आरोपी यांची नावे आहेत. तसेच इतर दोन आरोपी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
आरोपी यांनी रहाटणी परिसरात शुक्रवारी (दि. ३०) तोडफोड करून दहशत निर्माण केली. घराबाहेर बसलेल्या आकाश दत्तात्रय जाधव यांच्यावर आरोपी याने कोयत्याने जीवघेणा हल्ला केला होता. तसेच त्यांच्या घरावर दगड मारून, दरवाजावर लाथा मारल्या. कोयत्याने दुचाकीचे नुकसान केले. एमएसईबीच्या डीपी बाॅक्स व पथदिव्याचे नुकसान केले. आराडाओरडा व शिवीगाळ करून कोयते हवेत फिरवून आरोपी यांनी दहशत निर्माण केली.
पोलिसांनी सहा आरोपींना अटक करून त्यांचे टक्कल करून त्यांची धिंड काढली. त्यावेळी या आरोपींना पाहण्यासाठी परिसरातील नागरिक, महिला, लहान मुले यांनी गर्दी केली होती. सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्याच्या उद्देशाने ही धिंड काढण्यात आली असावी, अशी चर्चा नागरिकांमध्ये होती.
आरोपी यांनी कुठेकुठे तोडफोड केली याची पाहणी करण्यासाठी त्यांना घटनास्थळी घेऊन गेलो होतो. गुन्ह्यात त्यांनी वापरलेले दोन कोयते देखील त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले आहेत.
- वीरेंद्र चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक, वाकड