आवक घटल्याने गवार, हिरवी मिरची, आले महागले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 12:21 AM2019-04-01T00:21:50+5:302019-04-01T00:22:10+5:30
पिंपरी मंडई : भाज्यांच्या दरामध्ये वाढ; बटाटा, कांद्याचे दर स्थिर
पिंपरी : येथील लाल बहाद्दूर शास्त्री भाजीमंडईत रविवारी भाज्यांची आवक कमी झाली. त्यामुळे बहुतांश भाज्यांचे दर तेजीत होते. आल्याची आवक कमी झाल्यामुळे त्याच्या दरात वाढ झाली आहे. मागील आठवड्यामध्ये आले ७० रुपये किलो होते. या आठवड्यात त्यामध्ये वाढ होऊन त्याचे दर ९० ते १०० रुपये किलो झाले आहेत.
हिरवी मिरची, भेंडी व गवारची आवक कमी झाल्यामुळे त्यांचे भाव वाढले आहेत. टोमॅटोचीही आवक कमी झाली आहे. वाटाण्याच्या भावामध्ये वाढ होऊन वाटाणा ५० ते ६० रुपये किलो दराने विकला जात आहे. दोडका, घोसाळी, पडवळ, पावटा यांच्या दरामध्येही वाढ झाली आहे. हिरवी मिरची महाग झाली असून, त्याची ७० ते ९० रुपये किलो दराने विक्री होत होती. कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्याचे भाव १० ते १२ याप्रमाणेच आहेत. बटाट्याचे दर स्थिर असून, त्यांची १२ ते १५ रुपये किलो दराने विक्री सुरू होती. वांगी, फ्लॉवर, शिमला मिरची, गवार यांचेही भाव वाढले आहेत. उन्हाच्या झळा जाणवू लागण्याने काकडी व लिंबाला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. काकाडीची ४० ते ४५ रुपये तर लिंबू २०० रुपये शेकडा याप्रमाणे विकले जात होते.
फळबाजारामध्ये हापूस, बदाम आणि लालबाग आंबा दाखल झाला आहे. हापूस आंबा ५०० ते १००० रुपये डझन, बदाम आंबा ७० ते १०० व लालबाग आंबा ८० ते १०० रुपये किलो दराने विकला जात आहे.
पालेभाज्यांचे भाव पुढीलप्रमाणे
कोथिंबीर : १० ते १५, मेंथी : १५, शेपू : १० ते १५, पालक : १० ते १५, मुळा : २०, कांदापात : १०, तांदुळजा : १०, पुदिना : ५.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे :
सफरचंद : १६०, पेरू : ४० ते ६०, पपई : ३०, डाळींब : ८०, मोसंबी : ६० ते ८०, संत्री : ६० ते ८०, किवी : १०० (८ नग) , ड्रॅगन फ्रुट : १०० (१ नग) , पिअर : १२० ते २००, द्राक्षे : १२० (सफेद), १६० ते २२० (काळे), १२० ते २०० (बदाम), १६० ते २०० (लालबाग), आंबे : ५०० ते १०००(हापूस) डझन.
फळभाज्यांचे किरकोळ विक्रीचे दर (प्रतिकिलो)
४बटाटे : १४ ते १५, कांदे : १२ ते १५, टोमॅटो : २० ते २५, गवार : ८० ते ९०, दोडका : ७०, घोसाळी : ६०, लसूण : ८०, आले : ९० ते १००, भेंडी : ६०, वांगी : ४०, कोबी : ४०, फ्लॉवर : ३०, शेवगा : ४०, हिरवी मिरची : ७० ते ९०, शिमला मिरची : ५५, पडवळ : ४०, दुधी भोपळा : ४०, लाल भोपळा : २०, काकडी : ४०, चवळी : ५०, काळा घेवडा : ७० ते ८०, तोंडली : ५०, गाजर : २५, वाल : ६०, राजमा : ७०, मटार : ५० ते ६०, कारली : ६०, पावटा : ७०, श्रावणी घेवडा : ९० ते १००, लिंबू : २०० (शेकडा)