इंधन दरातील कपातीने पीएमपीला दिलासा, डिझेलवरील दररोजचा खर्च ४ लाखांनी झाला कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 01:34 AM2018-12-27T01:34:29+5:302018-12-27T01:34:31+5:30
मागील काही महिन्यांत सतत होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) आर्थिक गणित कोलमडले होते.
पिंपरी : मागील काही महिन्यांत सतत होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) आर्थिक गणित कोलमडले होते. मात्र, डिसेंबर महिन्यात इंधनाच्या दरात कपात झाल्याने पीएमपीएमएलला मोठा दिलासा मिळाला. रोजचा डिझेलवर होणारा चार लाखांचा खर्च कमी झाल्याने पीएमपीएमएलचे आर्थिक गणित जुळले आहे.
पीएमपीला दररोज ३८ हजार लिटर डिझेल लागते. मात्र, इंधनदरवाढीमुळे पीएमपीला आर्थिक झळ सहन करावी लागली होती. सप्टेंबर महिन्यात लिटरमागे सुमारे ६ रुपये २६ पैशांनी डिझेल महागले होते. त्यामुळे पीएमपीचे आर्थिक गणित कोलमडले होते. दरम्यान, पीएमपी प्रशासनाने तिकीट दर वाढीचाही प्रस्ताव ठेवला होता. मात्र, तो प्रस्ताव संचालक मंडळाने फेटाळला. जुन्या गाड्या, कमी झालेले प्रवासी तर दुसरीकडे देखभाल दुरुस्तीसाठी लागणारा खर्च त्यामुळे पीएमपीचे आर्थिक घडी विस्कटली होती. दरम्यान, डिझेलच्या दरात १० रुपये ९५ पैशांनी घट झाल्याने डिझेलवरील रोजचा सुमारे चार लाखांचा खर्च कमी झाला आहे.
पीएमपीमध्ये ५७१ बस सीएनजीच्या आहेत. तर ८५० पेक्षा जास्त बस डिझेलवर चालतात. दररोज पीएमपीला साधारण ३८ हजार लिटर डिझेल खरेदी करावे लागते.
पीएमपीच्या अनेक बस सीएनजी गॅसवर चालतात. सीएनजी बस वापरामुळे पीएमपीचे पैसेही वाचतात. मात्र, सीएनजी दरातही किलोमागे तीन रुपये वाढले होते.