क्षेत्रीय कार्यालयांचे अध्यक्ष बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 03:00 AM2017-08-10T03:00:44+5:302017-08-10T03:00:44+5:30
महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या अध्यक्षपदी केशव घोळवे, सचिन चिंचवडे, अश्विनी जाधव, शशिकांत कदम, भीमाबाई फुगे, साधना मळेकर, अभिषेक बारणे आणि अंबरनाथ कांबळे यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली.
पिंपरी : महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या अध्यक्षपदी केशव घोळवे, सचिन चिंचवडे, अश्विनी जाधव, शशिकांत कदम, भीमाबाई फुगे, साधना मळेकर, अभिषेक बारणे आणि अंबरनाथ कांबळे यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. यातील सातजण हे भाजपाचे नगरसेवक असून, एका क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षपदी साधना मळेकर या भाजपाशी संलग्न अपक्ष नगरसेविकेची निवड झाली.
पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या व प्रशासकीय कामकाजाच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने भाजपने नवीन दोन क्षेत्रीय कार्यालयांची निर्मिती केली आहे. त्यामुळे पूर्वीचे सहा व नवीन दोन अशा आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या अध्यक्षांची निवड महापालिकेच्या मुख्य कार्यालयात झाली. विरोधी पक्षांनी एकही अर्ज दाखल केलेला नव्हता. त्यामुळे सत्ताधारी भाजपाच्या जागा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. भूजल संचालनालयाचे संचालक शेखर गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यानंतर अध्यक्षांच्या निवडीवर बुधवारी शिक्कामोर्तब झाले. सायंकाळी सहावाजेपर्यंत क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर
अध्यक्षांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
महापालिका कामकाजाचे विकेंद्रीकरण
सध्या महापालिकेत अधिकारी व कर्मचारी मिळून सुमारे साडेसात हजार इतके मनुष्यबळ आहे. महापालिकेच्या मुख्य कार्यालयावरील ताण कमी करण्याबरोबर नागरिकांच्या समस्या स्थानिक ठिकाणी सोडविण्यात याव्यात, या उद्देशाने आणखी दोन क्षेत्रीय कार्यालये तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे कामकाजाचे विकेंद्रीकरण होणार आहे. त्यानुसार मनुष्यबळाची रचना करण्यात आली आहे. आठही क्षेत्रीय कार्यालयांसाठी एकूण २८८५ अधिकारी व कर्मचारी देण्यात आले आहेत, असे सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी सांगितले.