वाहतूककोंडी नित्याचीच
By admin | Published: June 28, 2017 04:09 AM2017-06-28T04:09:44+5:302017-06-28T04:09:44+5:30
तापकीर चौकातून काळेवाडी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रहाटणी फाटा चौकात वाहतूकीची कोंडी ही समस्या नित्याचीच झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रहाटणी : तापकीर चौकातून काळेवाडी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रहाटणी फाटा चौकात वाहतूकीची कोंडी ही समस्या नित्याचीच झाली आहे. या चौकात सकाळच्या वेळेत उभे राहणाऱ्या मजूरांना जीव मुठीत घेऊन थांबावे लागत आहे.
मागील अनेक वर्षांपासून राहटणी फाटा येथे मजूर अड्डा अस्तित्वात आहे. या अड्डयावर शेकडो नागरिक मजूरीच्या प्रतिक्षेत उभे असतात. मात्र या मजूरांना उभे राहण्यासाठी वेगळी जागा उपलब्ध नसल्याने मुख्य चौकातच रस्त्याच्या बाजूला उभे राहावे लागते. त्यामुळे, काळेवाडीकडून काळेवाडी फाटा व राहाटणी गावाकडे जाणाऱ्या रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. याच चौकात टेम्पो, ट्रक, बस, सहा आसणी रिक्षा आणि तीन आसणी रिक्षांनी अघोषित थांबा केल्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडीत भर पडली आहे. अवजड वाहनांमुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या मजूरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
काळेवाडी फाटा ते एमएम विद्यालय या दुतर्फी मार्गावर मोठ्या प्रमाणात बस, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, उभे केले असल्याने व त्याच समांतर रांगेत हातगाडीवाले, फेरीवाले, पथारीवाले व छोटे व्यावसायिक उभे राहात असल्याने वाहन चालकांना तीन पदरी रस्ता असूनही एका रांगेचाच उपयोग रहदारीसाठी करावा लागत आहे. त्यामुळे, तापकीर चौक, धनगरबाबा मंदीर चौक व रहाटणी चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. काळेवाडी फाटा ते एमएम विद्यालय या बीआरटीएस मार्गिकेमधील अनधिकृतपणे पार्कींग केलेली वाहने काढून हा रस्ता वाहतूकीसाठी खुला करावा. हा रस्ता खुला झाल्यास वाहतूक कोंडीस आळा बसून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.