बोगस कंपनी काढून विमा कंपनीला गंडा
By admin | Published: December 1, 2014 03:32 AM2014-12-01T03:32:21+5:302014-12-01T03:32:21+5:30
अस्तित्वातच नसलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची विमा कंपनीकडे नोंदणी केल्यानंतर हे कर्मचारी आजारी पडल्याचे दाखवत उपचार केल्याची कागदपत्रे सादर करून विमा कंपनीला १९ लाख ४७ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला
पुणे : अस्तित्वातच नसलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची विमा कंपनीकडे नोंदणी केल्यानंतर हे कर्मचारी आजारी पडल्याचे दाखवत उपचार केल्याची कागदपत्रे सादर करून विमा कंपनीला १९ लाख ४७ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. एका खासगी विमा कंपनीमध्ये डिसेंबर २०१३ ते एप्रिल २०१४ दरम्यान घडलेल्या या प्रकाराप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राहुल झेवेरीचंद गाला (रा. नर्मदा सोसायटी, भाइंदर पूर्व), पटेल असोसिएट्स कंपनी, भाइंदर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या वतीने उपप्रबंधक संदीप सरदेशपांडे (वय ३२, रा. धानोरी) यांनी फिर्याद दिली आहे. गत वर्षी डिसेंबरमध्ये गाला अधिकृत प्रतिनिधी असलेल्या पटेल असोसिएट्स कंपनीतील आठ कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा उतरविण्यात आला होता. त्यांचा १ लाख ३० हजारांचा हप्ता धनादेशाद्वारे भरण्यात आला होता. कंपनीला कागदपत्र सादर करण्यात आली होती. कंपनीचा पत्ता भाइंदर येथील खारीगाव येथील बीपीएक्स रस्त्यावर असलेल्या लता अपार्टमेंट असा दाखविण्यात आला होता.
आरोग्य विमा उतरवल्यानंतर जानेवारी ते एप्रिल २०१४ या चार महिन्यांमध्ये हे आठही कर्मचारी आजारी पडल्याचे दाखवून त्यांच्यावर गुजरात येथील बसना येथे उपचार केल्याची कागदपत्रे या विमा कंपनीला सादर करण्यात आली. (प्रतिनिधी)