देहूरोडमधील खड्ड्यांची झाली दुरुस्ती, प्रशासनाकडून दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 12:35 AM2018-10-01T00:35:26+5:302018-10-01T00:35:45+5:30
वाहनचालकांची सोय; वाहतुकीचा वेग वाढला
देहूरोड : मुंबई-पुणे महामार्गाच्या देहूरोड भागात सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम अर्धवट असून, गेल्या वर्षी पुलाजवळून नव्याने बनविलेल्या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंना एक किलोमीटर अंतरापर्यंत विविध ठिकाणी खड्ड्यांची मालिका तयार झाली आहे. रस्त्याची अक्षरश: चाळण झाली होती. खड्डे चुकविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. दुचाकी वाहने घसरून अपघात होऊ लागले होते. याबाबत ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनुसार संबंधित ठेकेदाराने महामार्गावरील धोकादायक बनलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती केली असून, वाहतुकीचा वेग वाढला असून स्थानिक नागरिक, कामगारवर्ग व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
देहूरोड बाजारपेठ भागात गेल्या वर्षी पुलाचे व एलिव्हेटेड रस्त्याचे कामासाठी जुन्या महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी नव्याने डांबरी रस्ता तयार करण्यात आला होता़ मात्र रस्ता बनविल्यानंतर विविध ठिकाणी लहानमोठे खड्डे पडले होते. पावसाने दोन्ही बाजूंच्या एक किलोमीटर अंतरापर्यंतच्या मुख्य रस्त्यावर विविध ठिकाणी मोठे खड्डे पडले होते. खड्डे चुकविताना अपघात होत होते. रस्त्यालगतच्या बाजूपट्ट्या खचल्याने लांबलचक खोलगट चर वजा गटार तयार झाली होती़ त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पाणी जाण्यासाठी संबंधितांकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे वाहने रस्त्याच्या खाली उतरविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. बाजूंच्या खड्ड्यांत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. परिणामी वाहने आदळून वाहनांचे नुकसान होत होते. खड्ड्यांमुळे महामार्गावरील वाहतूक अत्यंत धीम्या गतीने होऊन वारंवार वाहतूककोंडी होत होती.
याबाबत लोकमतने ‘धोकादायक खड्ड्यांमुळे अपघात’ या शीर्षकाने सविस्तर वृत्त प्रसिद्ध (दि़ ९ सप्टेंबर) तसेच ‘उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात’ या शीर्षकाने दि़ १९ सप्टेंबरच्या अंकात महामार्गावर खड्डे पडल्याचे व कंत्राटदाराचे शास्त्रोक्त पद्धतीने खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष झाल्याबाबत रस्ते विकास महामंडळास देहूरोड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचने रेषेत विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे मागणी केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते.