आंदोलनाचे पडसाद राज्यभर; पुणे विभागातील एसटीच्या १ हजार ७७२ फेऱ्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 12:39 PM2023-09-06T12:39:47+5:302023-09-06T12:40:08+5:30
पुणे विभागाला ५७ लाख ३० हजार ६३५ रुपयांचे आर्थिक नुकसान
पिंपरी : एसटी विभागाने मराठा आरक्षण आंदोलनामुळे सलग चौथ्या दिवशीदेखील एसटीच्या काही फेऱ्या रद्द केल्या आहेत. पुणे विभागातील १२ प्रमुख आगारांमध्ये मागील चार दिवसांत एसटीच्या १ हजार ७७२ फेऱ्या आणि १ लाख ४६ हजार ४८६ किलोमीटर प्रवास अंतर रद्द झाले. यामुळे पुणे विभागाला ५७ लाख ३० हजार ६३५ रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे हे आंदोलन चिघळले. त्याचे पडसाद राज्यातील विविध ठिकाणी उमटले. काही ठिकाणी आंदोलकांनी एसटी बसना लक्ष्य करीत बस पेटविल्याने मागील चार दिवसांपासून एसटीचे वेळापत्रक कोलमडले आहे. पुणे विभागालादेखील याचा फटका बसला आहे. पुणे विभागातून छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जळगाव, परभणी, आष्टी (बीड), कळंब, नांदगाव, धुळे, हिंगोली, भूम, लातूर, उमरगा या आगारांच्या बस सुटल्या नाहीत. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. एसटी बंद असल्यामुळे प्रवाशांना खासगी बसने प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांची मागणी असल्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात आहे.