मेट्रो करणार ‘त्या’ वृक्षांचे पुनर्रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 03:08 AM2017-12-03T03:08:11+5:302017-12-03T03:08:19+5:30
पुणे व पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सध्या महामेट्रोच्या वतीने मेट्रो प्रकल्पांच्या दोन मार्गिकांचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना प्रकल्पाच्या मार्गात अनेक वृक्षांचे अडथळे येत आहेत. सदर वृक्षांचे पुनर्रोपण ही संपूर्णत: महामेट्रोची जबाबदारी असून, या वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.
पिंपरी : पुणे व पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सध्या महामेट्रोच्या वतीने मेट्रो प्रकल्पांच्या दोन मार्गिकांचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना प्रकल्पाच्या मार्गात अनेक वृक्षांचे अडथळे येत आहेत. सदर वृक्षांचे पुनर्रोपण ही संपूर्णत: महामेट्रोची जबाबदारी असून, या वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे जागतिक पातळीवर सर्वमान्य असलेल्या पद्धतीनुसार हे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. या पद्धतीने पुनर्रोपण केल्यास वृक्षांचा तग धरण्याचा दर हा सर्वाधिक असल्याने महामेट्रो ही पद्धत अवलंबित आहे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
या पद्धतीनुसार पिंपरी येथील वल्लभनगर एसटी स्टॅण्डमागे असलेल्या सहयोग केंद्राच्या आवारात वरील पद्धतीने पहिल्या दहा वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपासून निगडीपर्यंत मेट्रो मार्गिका न्यावी जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना मेट्रोचा फायदा होईल, अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून होत आहे. ही मागणी लक्षात घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीने आवश्यक डीपीआर बनविण्याची विनंती महामेट्रोकडे केली आहे.
अशी होणार
पिंपरीतील मेट्रो
सध्या भोसरी (नाशिक फाटा ते खराळवाडी) आणि सीएमई ते मेगामार्ट या दोन ठिकाणी पिंपरी-चिंचवडच्या मेट्रोचे काम सुरू आहे. आतापर्यंत संपूर्णपणे ४ खांब उभारले आहेत. पीअर कॅप शिवाय ११ खांब उभारले आहेत. ४८ खांबांचा पाया रचला आहे. हॅरिस ब्रीज येथील काम ७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पावसाळ्यापूर्वी ३० जून २०१८ पर्यंत तेथील सबस्ट्रक्चर पूर्ण होईल. याशिवाय मेट्रोसाठी आवश्यक ४१ सेगमेंट देखील तयार असून, व्हायाडक्टचा पहिला स्पॅन हा अंदाजे २६ डिसेंबरपर्यंत तयार होईल, असे डॉ. दीक्षित यांनी सांगितले.