कावळ्यांच्या हल्ल्यात भेदरलेल्या विदेशी पाहुण्या पक्षाची सुखरूप सुटका..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 06:35 PM2020-02-07T18:35:41+5:302020-02-07T18:44:54+5:30
कावळ्याच्या हल्ल्यातून झाला बचाव
चिंचवड : सायंकाळी साडेपाच वाजताची वेळ.. चिंचवडमधील रस्टन कॉलनीमध्ये एका पांढरा शुभ्र विदेशी जातीच्या पक्षावर कावळ्यांचा हल्ला. यामुळे भेदरलेल्या या विदेशी पाहुण्या पक्षाला पाहून येथील रहिवासी त्याच्या मदतीला धावले.कावळ्यांच्या हल्ल्यातून याचा बचाव करत त्या पक्षाला महापालिकेच्या उद्यानात देण्यात आले.पांढराशुभ्र रुबाबदार पक्षी कावळ्याच्या हल्ल्याने भेदरलेला पाहून रस्टन कॉलनीत राहणाऱ्या सुभाष मालुसरे यांनी त्या पक्षाकडे धाव घेतली.कावळ्यांना हुसकावत या पक्षाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र घाबरलेला हा पक्षी प्रतिहल्ला करीत होता.कधी न पाहिलेला हा पक्षी दुर्मिळ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याला पकडण्यासाठी त्यांनी छोटी जाळी घेतली त्याला अगदी अलगदपणे या जाळीत ठेवण्यात त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
महापालिकेच्या उद्यान अधीक्षकांना संपर्क साधुन घटनेची माहिती दिली. अधीक्षक साळुंखे यांनी पक्षी मित्र अभिषेक देशमुख यांना घटनास्थळी पाठविले.तेव्हा देशमुख यांनी हा ऑस्ट्रेलियन कॉकेटील जातीचा पक्षी असल्याचे सांगितले. तो घाबरला असल्याने काही खाणार नाही, असे सांगितले.त्याची पाहणी करून तो सुखरूप असल्याचा खुलासा देशमुख यांनी केला. या पाहुण्या पक्षाला उद्यान विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.या पक्षाला वाचविण्यासाठी मालुसरे व नारायण वणवे यांनी अथक परिश्रम घेतले. या विदेशी पाहुण्याला सुखरूप असल्याचे पाहून नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.कावळ्याच्या हल्ल्यातून या विदेशी पाहुण्या पक्षाची सुटका केल्याबद्दल मालुसरे यांचे कौतुक होत आहे.