शहरासाठी मुळशी धरणातील ७६० एमएलडी पाणी आरक्षित करा; महापालिकेचे जलसंपदा विभागाला पत्र

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: December 13, 2023 12:54 PM2023-12-13T12:54:09+5:302023-12-13T12:55:31+5:30

पिंपरी-चिंचवड शहराला गेल्या चार वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे

Reserve 760 MLD water from Mulshi Dam for the pimpri chinchwad city Municipal Corporation's letter to Water Resources Department | शहरासाठी मुळशी धरणातील ७६० एमएलडी पाणी आरक्षित करा; महापालिकेचे जलसंपदा विभागाला पत्र

शहरासाठी मुळशी धरणातील ७६० एमएलडी पाणी आरक्षित करा; महापालिकेचे जलसंपदा विभागाला पत्र

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या सध्याचा लाेकसंख्या वाढीचा दर आणि २०४१ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन वाढीव पाण्याची गरज आहे. ही गरज लक्षात घेता मुळशी धरणातून ७६० एमएलडी पाणी शहरासाठी आरक्षित करावे, अशा मागणीचे पत्र महापालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाला नुकतेच दिले आहे. तसेच यासाठी लागण्यात येणारा पुनर्स्थापना खर्च देण्यास महापालिका तयार असल्याचेही म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला गेल्या चार वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. शहर चारही बाजूने झपाट्याने वाढत असताना लाेकसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या घरात आहे. शहरासाठी पवना धरणातून ५१०, आंद्रातून १००, भामा-आसखेड धरणाचे १६७ असे ७७७ एमएलडी पाणी आरक्षित आहे. सध्या शहरवासियांना पवना धरणातून ५१०, आंद्रा धरणातून ७५आणि एमआयडीसीकडून २० असे ६०५ एमएलडी पाणी देण्यात येत आहे. त्यानंतरही शहरातील विविध भागातील साेसायट्यांना कमी दाबाने आणि अपुरा पाणी पुरवठा हाेत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

सध्याच्या लाेकसंख्या वाढीचा वेग लक्षात घेता शहराची २०३१ मध्ये ५२लाख ७४ हजार तर २०४१ मध्ये ९६ लाख ३ हजार लाेकसंख्या हाेईल, असे अनुमान गृहित धरण्यात आले आहे. या लाेकसंख्येला सुमारे १५०० एमएल़डी पाणी लागणार आहे. त्यामुळे भविष्याचे आतापासून नियाेजन करणे काळाची गरज आहे. त्यानुसार महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने तयारी सुरू केली आहे. लाेणावळा येथील टाटा कंपनीच्या मुळशी धरणातून ७६० एमएलडी पाणी मिळावे, असे पत्र महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जलसंपदा विभागाला दिले आहे.

असे वापरणार महापालिका पाणी...

मुळशी धरणातून पाणी पिंपरी-चिंचवडसाठी ७६० एमएलडी आरक्षित करावे. पिण्याचे पाण्याचे आरक्षण औद्योगिक, व्यावसायिक व घरगुती या प्रकारामध्ये विभागून देणे आवश्यक आहे. औद्योगिक व व्यावसायिक कारणांसाठी १.५० टक्के व उर्वरीत ९८.५० टक्के घरगुती पिण्याच्या प्रयोजनात वापरले जाणार आहे.

लाेकसंख्या वाढीचा विचार करता मुळशी धरणातून ७६० एमएलडी पाणी शहरासाठी आरक्षित करावे, यासाठी जलसंपदा विभागाला पत्र दिले आहे. शासन सकारात्मक निर्णय घेईल, ही अपेक्षा. - श्रीकांत सवणे, मुख्य अभियंता.

Web Title: Reserve 760 MLD water from Mulshi Dam for the pimpri chinchwad city Municipal Corporation's letter to Water Resources Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.