निळ्या पूररेषेतील गावठाण भाग रहिवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 03:10 AM2018-06-28T03:10:48+5:302018-06-28T03:10:51+5:30
महापालिकेतील जुन्या व वाढीव क्षेत्राच्या हद्दीतील निळ्या पूररेषेच्या बाहेरील ना विकास विभागातील क्षेत्र रहिवास विभागात सामाविष्ट करण्याबाबत निर्णय झाला
पिंपरी : महापालिकेतील जुन्या व वाढीव क्षेत्राच्या हद्दीतील निळ्या पूररेषेच्या बाहेरील ना विकास विभागातील क्षेत्र रहिवास विभागात सामाविष्ट करण्याबाबत निर्णय झाला आहे. निळ्या पूररेषेच्या बाहेरील ना विकास विभागातील क्षेत्र रहिवास विभागात सामाविष्ट करण्याची शासनाने नुकतीच मान्यता दिलेली आहे, अशी माहिती आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने मूळ व वाढीव हद्दीच्या क्षेत्रातील निळ्या पूररेषेच्या बाहेरील ना विकास विभागातील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिकेने सादर केलेल्या प्रस्तावास अधिमूल्य आकरणी व पंधरा टक्के सुविधा क्षेत्र ठेवणे बंधनकारक करून शासनाची मंजुरी मिळाली आहे. समाविष्ट जागेच्या प्रचलित वार्षिक मूल्यदर तक्त्यातील दर आणि क्षेत्रावर परिगणीत होणाऱ्या रकमेच्या ५ टक्के दराने अधिमूल्य आकारवयाचे धोरण निश्चित करून त्याबाबतचे शासन निर्देश देण्यात आले आहेत.
जमीन मालकांनी सन २०१८-१९ या वर्षातील बाजारमूल्य दर तक्त्यानुसार जमीन दर आणि क्षेत्रावर परिगणीत होणाºया रकमेच्या पाच टक्के या दराने येणारी रक्कम अधिमूल्य म्हणून भरणा करणे बंधनकारक आहे. एकूण निर्धारित अधिमूल्य रकमेपैकी पन्नास टक्के एवढी रक्कम संबंधित जमीन मालकाने जिल्हास्तरावरील नगररचना विभागाच्या शाखा कार्यालयाच्या लेखाशीर्षामध्ये जिल्हा कोशागरामध्ये जमा करणे आवश्यक राहील. उर्वरित पन्नास एवढी रक्कम आयुक्त पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे, असे जगताप यांनी सांगितले.