महापालिकेत भाजपात नाराजी, राजीनामा सत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 05:28 PM2019-07-04T17:28:05+5:302019-07-04T17:29:11+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये गेल्या दोन वर्षांपासून राजीनामा सत्र सुरुच आहे.
पिंपरी : महापालिकेत सत्ता आल्यापासून सत्ताधारी भाजपमधील राजीनामा सत्र सुरू आहे. वैयक्तिक कारण दाखवून पिंपळेनिलखचे भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यत्वाचा राजीनामा महापौर राहुल जाधव यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे भाजपात नाराजीचा सूर आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये गेल्या दोन वर्षांपासून राजीनामा सत्र सुरुच आहे. पहिल्याच वर्षी निष्ठावान कार्यकर्ते नगरसेवक शीतल शिंदे यांनी विधी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यानंतर स्थायी समिती भोसरीला न मिळाल्याने राहुल जाधव, शीतल शिंदे यांनी स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. विधी समिती मागितली असताना क्रीडा समिती दिल्याचा आरोप करत भाजप नगरसेविका अश्विनी बोबडे यांनी नियुक्तीनंतर पाचच मिनिटात क्रीडा समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. जाधववाडीचे वसंत बोराटे यांनी विधी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच तत्कालीन महापौर नितीन काळजे यांनीही राजीनामाअस्त्र उगारले होते. कासारवाडीच्या भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांनी शहर सुधारणा समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता तुषार कामठे यांनी वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.