‘मिसिंग लिंक’ला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 02:56 AM2018-03-30T02:56:51+5:302018-03-30T02:56:51+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोरघाटात होणारी वाहतूककोंडी सोडविण्याकरिता खालापूर
लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोरघाटात होणारी वाहतूककोंडी सोडविण्याकरिता खालापूर टोलनाका ते सिंहगड कॉलेज कुसगावदरम्यान होणाऱ्या मिसिंग लिंक या १३.३ मार्गाचा बोगदा व उड्डाणपूल मार्गाच्या कामाला पर्यावरण विभागाने परवानगी दिली आहे. मात्र, स्थानिक नागरिकांनी या कामाला विरोध केला आहे.
द्रुतगती मार्गाची निर्मिती २००० साली झाली. मात्र आजही सेवा रस्ता, जोड रस्ते, ग्रामपंचायतीच्या कराचा विषय, पूर्वीचे भूसंपादन असे अनेक विषय प्रलंबित असल्याने नुकत्याच झालेल्या जनसुनावणीमध्ये कुसगाव ग्रामस्थांनी मिसिंग लिंकच्या कामाला विरोध केला आहे. निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी देखील स्थानिकांचे रखडलेले विषय मार्गी लावल्यानंतरच नवीन प्रकल्पाचा विषय हाती घ्या, असे या जनसुनावणी करिता आलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या पर्यावरण विभागाला सांगितले.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे काम करण्यात आले. त्या वेळी कुसगाव येथून खालापूर दरम्यान प्रस्तावित असलेला मार्ग अचानक बदलत वलवण गावाच्या बाजूने पांगोळी, तुंगार्ली मार्गे खंडाळा घाटातून वळविण्यात आला.
यामुळे खंडाळा ते खालापूर दरम्यान राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती मार्ग एकत्र आल्याने घाट परिसरात दैनंदिन वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी खालापूर टोलनाका ते कुसगाव सिंहगड कॉलेज दरम्यान १३.३ किमी अंतराचा मिसिंग लिंक हा आठ पदरी रस्ता बनविण्यात येणार आहे. यामध्ये ८.९ व १.६ किमी लांबीचे दोन बोगदे व ९०० व ६५० मीटरचे दोन व्हायाडक्ट असणार आहे. या प्रस्तावित मार्गात येणाºया वनजागेच्या बदल्यात वन विभागाला रायगड अथवा पुणे जिल्ह्यात बदली जागा देण्यात येणार आहे. तर ४० हजार नवीन वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. तसेच कामाच्या ठिकाणी कमीत कमी हवा व पाण्याचे प्रदूषण होईल याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे रस्ते विकास महामंडळाच्या वतीने या वेळी सांगण्यात आले. मात्र स्थानिक नागरिकांनी या कामाला विरोध केला आहे.
तसेच काही अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्यांनी बोगद्यामध्ये निर्माण होणारी गरम हवा बाहेर काढण्याकरिता किंवा आगी सारखी काही घटना घडल्यास काय उपाययोजना केल्या आहेत याबाबत प्रश्न उपस्थित केले. जागा मालक शेतकºयांना कसल्याही पूर्व सूचना न देता जागेचा सर्व्हे करणे, खांब लावणे असे प्रकार झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
लवकरच सर्व नागरिकांची कुसगाव गावात पुन्हा एकत्रित जनसुनावणी घेत स्थानिकांचे रखडलेले प्रश्न सोडविण्याबाबत निर्णय घेऊ, असे या वेळी अधिकाºयांनी सांगितले.
दरम्यान ‘मिसिंग लिंक’ ला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शविल्याने प्रशासन काय भूमिका घेतेय याकडे लक्ष लागले आहे. यापूर्वी रस्ते बांधणी करताना रखडलेले प्रश्न अगोदर मार्गी लावावेत त्यानंतरच नवीन काम हाती घ्यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांची आहे. त्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.