मोरवाडीतील मेट्रो स्टेशनला धनगर समाजातील नागरिकांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 04:32 PM2018-11-24T16:32:41+5:302018-11-24T16:36:47+5:30
मेट्रो स्टेशन कामामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचा दर्शनी भाग झाकला जात आहे.
पिंपरी: मोरवाडीतील मेट्रो स्टेशनचा आराखडयास धनगर समाजातील नागरिकांनी विरोध दर्शविला आहे, हा आराखडा बदलण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका आशा शेंडगे यांनी केली आहे.
मेट्रो रेल कॉर्पोरेशन मार्फत पिंपरी चिंचवड मनपा हद्दीमध्ये दापोडी ते एम्पायर इस्टेट पुलापर्यंत काम करण्यात येत आहे. या कामामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक , पिंपरी येथे मेट्रोचे स्टेशन बांधण्याचे काम चालु आहे. स्टेशन कामामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचा दर्शनी भाग झाकला जात आहे.या आराखड्यास विरोध दर्शविला आहे.
दरम्यान महापालिकेच्या बीआरटीएस विभागाने धनगर समाजाचे पदाधिकारी यांच्यात मेट्रोस्टेशनच्या आराखड्याचे सादरीकरण केले होते. महापालिका भवनातील कै. आण्णासाहेब मगर यांचा पुतळा व मनपाचे इमारतीचे इलेव्हेशन अबाधित ठेवण्यासाठी मेट्रो स्टेशन होळकर यांचे पुतळ्याकडे स्थलांतरीत केले आहे. स्टेशनचा जिना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकाचे पिंपरीचे बाजुकडील रस्त्याने सुरु होत आहे. स्टेशनचा काही भाग पुतळ्याचे वर येत असुन स्टेशनची उंची पुतळ्याचे वर सुमारे २.५० मीटर असणार आहे. स्टेशनमुळे पुतळा झाकला जाऊन पुतळ्यावर संपुर्ण सावली पडणार आहे. मेट्रोचा खांब पुतळ्याच्या समोर येणार आहे. यामुळे अहिल्यादेवी होळकर यांच्यापुतळ्याचे सौंदर्यामध्ये अडथळा येणार आहे, या बाबी सदस्यांनी बैठकीत मांडल्या होत्या.
याबाबत नगरसेविका आशा शेंडगे- धायगुडे यांनी मेट्रोचे अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. धायगुडे म्हणाल्या, आमचा मेट्रो कामाला विरोध नाही परंतु मेट्रो स्टेशनचे बांधकाम करण्यासाठी मेट्रोच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन नियोजनापुर्वी आराखडा दाखविणेची विनंती केली होती. परंतु याबाबत आम्हाला कोणतीही पुर्व कल्पना न देता मेट्रो स्टेशनचा आराखडा अंतिम करुन आमच्या समाजावर हेतु परस्पर अन्याय केलेला आहे. प्रशासनाने यामुद्यावरून संघर्ष होऊ नये, याची दक्षता घ्यावी. मेट्रो स्टेशनचा आराखडा बदलुन स्टेशन अहिल्यादेवी होळकर चौकालगत एम्पायर इस्टेट पुलाचे बाजुला स्थलांतरीत करावे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये पीएमपीएमएल बस थांबा, ग्रेड सेपरेटर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक असे नाव देण्यात यावे. मेट्रो स्टेशनलाही अहिल्यादेवी होळकर चौक चौक असे नाव द्यावे. स्टेशनची मिरर इमेज करुन स्टेशन स्थलांतरीत करणे तांत्रिक दृष्ट्या शक्य नसल्यास सद्यस्थितीतील अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा स्टेशन खाली येत आहे. पुतळा मागील जागेत स्थलांतरीत करावा.