आरक्षणामुळे तळेगावात चुरस कमी
By admin | Published: October 6, 2016 03:18 AM2016-10-06T03:18:13+5:302016-10-06T03:18:13+5:30
नगर परिषद निवडणुकीसाठी तळेगाव दाभाडे नगराध्यक्षपद सोडतीतून इतर मागासवर्गीय महिला उमेदवारांसाठी आरक्षित झाले आहे.
तळेगाव दाभाडे : नगर परिषद निवडणुकीसाठी तळेगाव दाभाडे नगराध्यक्षपद सोडतीतून इतर मागासवर्गीय महिला उमेदवारांसाठी आरक्षित झाले आहे. सत्ताधारी तळेगाव शहर विकास समिती आणि भाजपातर्फे सक्षम उमेदवारांची चाचपणी चालू असून, येत्या काही दिवसांत उमेदवारीचे चित्र स्पष्ट होईल. खुल्या वर्गातील उमेदवारांची संधी गेल्याने निवडणुकीतील चुरस मात्र कमी झाली आहे.
मुंबईत आरक्षणांच्या सोडती काढण्यात आल्या. तळेगाव शहर आणि परिसरात आरक्षणाबाबत उत्सुकता होती. ओबीसी महिला उमेदवाराला संधी मिळाली असल्याची वार्ता वाऱ्यासारखी शहरभर पसरली आणि खुल्या वर्गातील नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतील इच्छुकांचा हिरमोड झाला. यंदा थेट नागरिकांतून निवडणूक होणार असल्याने मतदारांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. पक्षांतर्गत पदवाटपाच्या खिरापतीस त्यामुळे खीळ बसणार आहे. नागरिकांनी प्रामाणिक, सक्षम आणि विकासाचा दूरदृष्टिकोन असलेल्या उमेदवारावर नगराध्यक्षपदाची धुरा सोपविली, तर शहराचा विकास लोकशाहीस अपेक्षित असल्याप्रमाणे होईल, असे जाणकारांचे मत आहे.(वार्ताहर)
नगराध्यक्षांना मिळणार ५ वर्षांचा कालावधी
नगर परिषदेत शहरविकास समिती सत्तेत आहे. येत्या निवडणुकीतील प्रचारात त्यांचा विकासकामे हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. गेल्या पाच वर्षांत सुरेश धोत्रे यांना अडीच वर्षे नगराध्यक्षपद मिळाले. त्यानंतर सुलोचना आवारे, माया भेगडे, शालिनी खळदे यांना नगराध्यक्षपदासाठी संधी देण्यात आली. मात्र, आगामी नगराध्यक्षाला पाच वर्षांचा सलग कालावधी मिळणार आहे.