बळीराजाच्या हाकेला प्रतिसाद

By admin | Published: June 3, 2017 02:20 AM2017-06-03T02:20:18+5:302017-06-03T02:20:18+5:30

दर शुक्रवारी लोणावळ्यातील पुरंदरे ग्राऊंडवर मोठ्या प्रमाणात भरणाऱ्या आठवडी बाजाराला भाजीपाला विक्रेत्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला

Responding to the victims' claims | बळीराजाच्या हाकेला प्रतिसाद

बळीराजाच्या हाकेला प्रतिसाद

Next

बंदोबस्तात आठवडे बाजार
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा : दर शुक्रवारी लोणावळ्यातील पुरंदरे ग्राऊंडवर मोठ्या प्रमाणात भरणाऱ्या आठवडी बाजाराला भाजीपाला विक्रेत्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला. पोलीस बंदोबस्तात बाजार भरविण्यात आला.
सकाळी साडेआठ वाजता पुरंदरे ग्राऊंडवर जमलेल्या लोणावळा शहर युवक कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी बंदला पाठिंबा दर्शवत बाजार न भरविण्याचे आवाहन विक्रेत्यांना केले होते. या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता लोणावळा शहर पोलिसांकडून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
काँग्रेसचे शहराध्यक्ष नारायण आंबेकर, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक निखिल कवीश्वर, सुधीर शिर्के, युवक काँग्रेस शहराध्यक्ष शिवराज मावकर, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष फिरोज बागवान, मंगेश बालगुडे, एनएसयुआयचे अध्यक्ष निखिल तिकोणे, फिरोज शेख व कार्यकर्त्यांनी आठवडे बाजारात भाजी बाजार न भरविण्याचे आव्हान शेतकरी व विक्रेत्यांना केले. बंदला पाठिंबा दिलेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता त्यांना पोलिसांनी कलम १४९ प्रमाणे नोटिसा बजावल्या.
लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आय. जे. शेख यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आठवडी बाजारात नेमण्यात आला होता. पोलीस बंदोबस्तांमध्ये लोणावळ्यात आठवडे बाजार भरविण्यात आला होता. राज्यभरात सर्वत्र शेतकऱ्यांचा संप सुरू असल्याने त्याचे पडसाद लोणावळ्यात उमटले.
भाजी विक्रीकरिता बाजारात भाजी विक्रेते कमी संख्येने आले होते. भाजीपाला बाजारात कमी आल्याने उपलब्ध भाज्यांचे भाव मात्र कडाडले होते. असे असताना देखील भाजी खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली होती.

भाज्यांची अल्प प्रमाणात विक्री सुरू
खडकी : शेतकऱ्यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी खडकी येथील होलसेल भाजी मंडई (दांडी) वर पन्नास टक्क््यापर्यंत भाजीपाल्याची आवक घसरली होती. त्यामुळे मागणी जास्त असल्याने खडकीत भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले होते.
दोन दिवसांपूर्वी टोमॅटो १० रुपये किलो होते ते आज ३५ ते ४० रुपये किलोने विकले जात होते, वांगे ६० रुपये, कोबी ८० रुपये, हिरव्या भाज्याही ३० रुपये जुडी याप्रमाणे होत्या. त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या महिला व किरक ोळ व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली़ काही हातगाडी व्यावसायिकांनी तर माल न घेता रिकामे जाणे पसंत केले.

मंडईत आवक घटली
लोकमत न्यूज नेटवर्क
देहूरोड : शेतकऱ्यांच्या संपामुळे पुणे-गुलटेकडी व पिंपरी-चिंचवड मंडईतून देहूरोड -किवळे भागात होणारा भाजीपाला पुरवठा दुसऱ्या दिवशी विस्कळीत झाला आहे. मात्र, मावळच्या काही गावांतील स्थानिक शेतकऱ्यांनी शेतमाल देहूरोडला विक्रीसाठी आणला असतानाही भाजीपाल्याचे दर सुमारे तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. संपाचा प्रभाव वाढल्यास शनिवारी भाजीपाल्याची आणखी आवक घटून भाज्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मावळ भागातील शेतकऱ्यांकडून व दूध व्यावसायिकांकडून घरपोच दूधपुरवठा व डेअरीला होणारा दूधपुरवठा सुरळीत असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले आहे.
गुरुवारी पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या संपाच्या पहिल्या दिवशी देहूरोड येथील महात्मा फुले मंडईत भाजीपाल्याची आवक काही प्रमाणात झाल्याने संपाचा प्रभाव फारसा जाणवला नाही. मात्र, शुक्रवारी दुसऱ्या दिवशी पुण्यातील गुलटेकडी तसेच पिंपरीतील मंडईतून येणारा भाजीपाला आला नाही.
मात्र, देहू व मावळ परिसरातील विविध गावांतून काही शेतकऱ्यांनी शेतीमाल आणून थेट विक्रेत्यानां दिला असतानाही मागणी वाढली असल्याने भाजीपाला मालाचे भाव सुमारे तीस ते पन्नास टक्क्यांनी वाढले आहेत. तर काही भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत.

हॉटेल व्यावसायिकांना फटका
भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला नसल्याने चढ्या दराने भाजीपाला खरेदी करावा लागल्याने हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. संपाच्या काळात भाजीपाल्याचा पुरवठा कमी झाला म्हणून हॉटेलमध्ये दरवाढ करता येत नाही, असे एका हॉटेल व्यावसायिकाने सांगितले. शेतीमाल वाढीव भावाने खरेदी करण्याची वेळ आल्याने दर वाढल्याचे मंडईतील व विकासनगर येथील किरकोळ व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले. मेथीची जुडी तीस रुपयांना विकली जात होती.


सांगवी मंडईतील साठा संपण्याची चिन्हे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगवी : राज्यातील शेतकरी संपावर गेल्याच्या आज दुसऱ्याच दिवशी सांगवी परिसरातील भाजी मंडई आणि हातगाडीधारक यांच्याकडील भाजीपाल्याचा साठा आणि आवक संपत आल्याने दुहेरी संकट समोर ठाकले आहे. त्यातच भाजीचे भाव चारपटीने वाढले असून दूध आणि त्यापासून बनविलेल्या वस्तूंची आवकही कमी झाल्याचे दिसून येत आहे.
सांगवीतील काटेपुरम चौक, साई चौक, कृष्णा चौक परिसरात भाजी विक्रेत्यांची संख्या नगण्य पहायला मिळाली. भाजी, दूध आणि फळांची मागणी वाढली असून भाजी विक्रेते अव्वाच्या सवा दराने भाजी विकत असल्याचे दिसून येत आहेत. केवळ दोनच दिवसांचा साठा असल्याने पुढील दिवस कठीण जाणार असल्याचे जाणकारांचे मत असून शासनाने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आहे.
जुनी आणि नवी सांगावीत सुमारे १०० ते १५० भाजी विक्रेते असून आज केवळ ४० भाजी विक्रेतेच भाजी विकताना पहायला मिळाले. माल मिळत नसल्याने हातावर हात धरून बसण्याशिवाय विक्रेत्यांना पर्याय नाही. जे विक्रेते भाजी विक्री करत आहेत त्यांच्याकडून जादा दराने भाजी खरेदी करावी लागत असल्याने गृहिणींचे स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले आहे.

चढ्या दराने विक्री

एका भाजी विक्रेत्याकडे भेंडी ८० रु. किलो, वांगी ६० रु. किलो कोबी ६०, टमाटे ५०, फूल ६०, कांदे ४० ह्या दराने भाजी विक्री होताना दिसून आली. यामुळे महिला वर्गाचे स्वयंपाक घरातील नियोजन कोलमडायला लागल्याचे पहायाला मिळत आहे. हॉटेल व्यावसायिकही अडचणीत आले असून छोटी रेस्टोरंट, खानावळ आणि भोजनालय येथील कमी होताना दिसत आहेत. एकूणच शेतकरी संपाच्या झळा आता शहरात जाणवू लागल्याचे स्पष्ट होत आहे.

लोक प्रतिनिधी असल्याने जनतेची समस्या लक्षात येऊनही काय करावे ते समजत नाही. सरकार यातून योग्य निर्णय घेईल तसेच सामान्य नागरिक म्हणून मलाही वैयक्तीकरित्या भाजी नसणे, दूध नाही ह्या समस्या सोडवताना त्रास होत आहे.
- अंबरनाथ कांबळे, नगरसेवक


भाजीविक्रेते, नागरिकांमध्ये संभ्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
कामशेत : राज्यभरातील शेतकऱ्यांनी गुरुवारपासून पुकारलेल्या संपाचा मावळ तालुक्यात म्हणावा तसा परिणाम झाला नसला तरी शेतकरी, भाजीविक्रेते व नागरिकांमध्ये मात्र संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
तालुक्यातील प्रमुख शहारांसह प्रमुख गावांमध्ये भाजी मंडई असून आठवडे बाजारही भरतो. शेतकरी संपाचा या बाजारावर मोठा परिणाम होईल, असे अनेकांकडून बोलले जात असताना तसा परिणाम जाणवत नाही. तालुक्यातील प्रमुख शहरांमध्ये भाजी मंडई व भाजीविक्रेते भाजीपाला विक्रीसाठी बसतात. शेतमालाची थेट विक्री करणारे शेतकरीही ठिकठिकाणी आढळतात.
कामशेत शहरात असणाऱ्या बेकरी व दूध विक्रेत्यांकडे शुक्रवारी दुधाच्या पिशव्यांची वाहतूक करणाऱ्या गाड्याच आल्या नसल्याने विक्रेते दूध शिल्लक नाही असे ग्राहकांना सांगत होते. अनेक किरकोळ भाजी विक्रेत्यांना भाजीपाला न मिळाल्याने त्यांनी दुकाने बंद ठेवली. ज्यांच्याकडे माल शिल्लक होता ते चढ्या भावाने विक्री करत होते. मावळातील अनेक शेतकऱ्यांचे काढणीला आलेले भुईमूग, काकडी, परसबी, आंबा शेतात तसेच पडून आहेत. अनेकांच्या दुधाच्या घागरी भरलेल्या पडून आहेत. या शेतकऱ्यांचा संपाला पाठिंबा आहे. संपाबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असली तरी शेतमालाच्या नुकसानीमुळे अनेक शेतकरी हळहळ व्यक्त करीत आहेत.

Web Title: Responding to the victims' claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.