पुण्यात मिळालेली दाद जगभरात कुठेच मिळत नाही : राहुल देशपांडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 09:03 PM2019-10-25T21:03:40+5:302019-10-25T21:05:10+5:30

लाेकमत दिवाळी पहाट कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचे सादरीकरण हाेणार आहे. त्या पार्श्वभूमिवर त्यांच्याशी साधलेला संवाद

the response get from pune is do not found anywhere in world : rahul deshpande | पुण्यात मिळालेली दाद जगभरात कुठेच मिळत नाही : राहुल देशपांडे

पुण्यात मिळालेली दाद जगभरात कुठेच मिळत नाही : राहुल देशपांडे

Next

पुणे : दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. आमच्यासाठी रसिकांसमोर गाणे सादर करणे हीच दिवाळी असते, असे मनोगत ख्यातनाम गायक राहुल देशपांडे यांनी व्यक्त केले. भारतीय अभिजात संगीतामध्ये  सृजनशीलतेची कास धरताना नाट्यसंगीतातूनही ‘कानसेनांना’ तृप्तीची अनुभूती देणारा प्रसिद्ध युवा गायक राहुल देशपांडे, ‘जोहार मायबाप’ सारख्या स्वरांमधून अभिजात गायकीचे दर्शन घडविणारी  गायिका मंजुषा पाटील आणि मधुर स्वरांमधून रसिकमनाचा ठाव घेणारी युवा गायिका सावनी रवींद्र यांच्या  सुरेल अविष्कारांनी रसिकांची दिवाळी पहाट संस्मरणीय ठरणार आहे.  युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत आणि डॉ.  सागर गणपतराव बालवडकर यांच्या सहयोगाने दि़ २७ ऑक्टोबरला पहाटे साडेपाचला चिंचवड येथील शिवाजी उदय मित्र मंडळ मैदानात ही ‘स्वरमैफल’ सजणार  आहे. या कार्यक्रमाला रांका ज्वेलर्स, लोकमान्य मल्टिपर्पज को.ऑप सोसायटीचे सहकार्य लाभले आहे. या निमित्ताने देशपांडे यांच्याशी साधलेला संवाद...

दिवाळी आणि संगीत यांचे अतूट स्नेहबंध जुळले आहेत. काय वाटते?
- मी अनेक वर्षांपासून दिवाळी पहाटच्या मैफिलींमध्ये गातो आहे. सकाळच्या प्रहरातील राग सहसा गायला मिळत नाहीत. दिवाळी पहाटच्या निमित्ताने गायकांसाठी सकाळचे राग गाण्याची ही पर्वणी असते.  दिवाळीच्या दिवसांमधील माहोलच खास असतो. सर्वत्र चैैतन्यमय, मांगल्यमय वातावरण असते.  रसिक अभ्यंगस्रान करुन, तयार होऊन छान वातावरणात गाणे ऐकण्यासाठी आलेले असतात. रसिकांकडून खूप सकारात्मकता मिळत असते. एकूण वातावरणातच सकारात्मकता आणि मांगल्य यांचा मिलाफ असतो. त्यामुळे गाणे रंगत जाते आणि मैैफिल सजते. गायकांना या वातावरणातून आणि रसिकांच्या प्रतिसादातून खूप उर्जा मिळते. त्यामुळे सादरीकरणाचा आनंद काही औैरच असतो. 

रसिकांचा प्रतिसाद कसा असतो?

- पुणेकर रसिक खरे दर्दी असतात. पुण्यात मिळालेली दाद जगभरात कुठेच मिळत नाही. पुणेकर रसिक अतिशय चोखंदळ असतात. जे संगीत मनापासून आवडते, त्याला ते दाद देतात. त्यामुळेच त्यांची दाद महत्वाची असते. मी अनेक वर्षांपासून पुण्यात गात आहे. मी स्वत: पुणेकर असल्याने माझे रसिकांशी अगदी घरचे नाते आहे. 

- सादरीकरणाची काय वैैशिष्टये असतील?
 सादरीकरणामध्ये विशेषत: सकाळच्या रागांना प्राधान्य असेल. याशिवाय, नाट्यगीते, भक्तीसंगीत आणि भावसंगीताचाही समावेश असेल. सावनी रवींद्रसह मी काही द्वंद्वगीतेही गाणार आहे. रसिकांना गायन नक्कीच पसंतीस पडेल, अशी खात्री वाटते.

लोकमत’सह आपले अनेक वर्षांचे  ॠणानुबंध आहेत. काय सांगाल?
 - मी ‘लोकमत’च्या दिवाळी पहाट मैैफिलींमध्ये अनेक वर्षांपासून गातो आहे. यंदा मी पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवडमध्ये सादरीकरण करतो आहे, त्यामुळे खूप उत्साह आहे. 

तरुणाईचा संगीताला कसा प्रतिसाद मिळतो आहे?
- मनोरंजनाचे खूप पर्याय सध्या उपलब्ध झाले आहेत. तरीही तरुणाई आवर्जून शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेण्यासाठी मैफिलींना येते. ‘कट्यार काळजात घुसली’नंतर शास्त्रीय संगीताला तरुणाईचा मिळणारा प्रतिसाद खूपच वाढला आहे. त्यांच्यामधून उत्तम कानसेन तयार होत आहेत, याचा आनंद वाटतो.

Web Title: the response get from pune is do not found anywhere in world : rahul deshpande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.