शाळांमधील नियमबाह्य खासगी परीक्षांना बंदी
By admin | Published: January 12, 2017 02:19 AM2017-01-12T02:19:44+5:302017-01-12T02:19:44+5:30
खासगी संस्थांकडून प्राथमिक शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या नियमबाह्य प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यावर प्राथमिक
राजगुरुनगर : खासगी संस्थांकडून प्राथमिक शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या नियमबाह्य प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यावर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने कायमस्वरूपी निर्बंध आणले आहेत. यापुढे आता शासन पुरस्कृत स्पर्धा परीक्षा वगळता इतर परीक्षा शिक्षकांना घेता येणार नाहीत.
या संदर्भात ७ जानेवारीला शिक्षण संचालक (प्राथमिक) गोविंद नांदेडे यांनी अध्यादेश प्रसिद्ध केला आहे. प्राथमिक शाळांमध्ये विविध खासगी संस्थांकडून तसेच काही प्रकाशनांकडून शिष्यवृत्ती परीक्षांच्या धर्तीवर खासगी स्पर्धा परीक्षांचे नियोजन केले जाते. या परीक्षांसाठी परीक्षा शुल्क वसूल केले जाते. त्यामुळे पालकांना विनाकारण भुर्दंड बसतो. याशिवाय, अशा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण येतो. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार कायदा अधिनियम २००९मध्ये अशा इतर परीक्षा घेण्याबाबत कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे यापुढे शासनाची परवानगी असल्याशिवाय बेकायदेशीर बाह्य परीक्षा शिक्षकांनी घेऊ नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत.