निवृत्त शिक्षकांचे पीएफसाठी हेलपाटे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 11:08 PM2018-12-20T23:08:27+5:302018-12-20T23:08:53+5:30
प्रशासन उदासिन : सहा महिने उलटूनही मिळाला नाही भविष्यनिर्वाह निधी
पिंपरी : महापालिकेचे शिक्षक व मुख्याध्यापक निवृत्त होऊनही त्यांना भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) व इतर सुविधा मिळाल्या नाहीत. या सुविधा निवृतीनंतर महिन्यात मिळणे अपेक्षित आहे. मात्र निवृत्त होऊन सहा महिने उलटूनही या सेवा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे ३५ वर्षे महापालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून काम केलेल्या निवृत्त शिक्षकांची ससेहोलपट सुरू आहे. या सुविधा लवकरात-लवकर मिळाव्यात, अशी मागणीशिक्षक व मुख्याध्यापकांनी केली आहे.
महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पीएफ व इतर सुविधा देण्यासाठी संबंधित टेबलवरील कर्मचाºयांकडे कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून संबंधित कर्मचारी सुटीवर असल्याने कामे रखडलेली आहेत. परंतु, मागील चार महिन्यांपासून कामाची पूर्तता का होऊ शकली नाही, असा प्रश्न निवृत्त मुख्याध्यापक विचारत आहेत. शिक्षण विभागातील कर्मचाºयांची अपुरी संख्या पाहता अनेक कामे खोळंबलेली असल्याचे दिसून येते. तोकड्या मनुष्यबळाअभावी नागरिकांना अनेकवेळा शिक्षण विभागामध्ये चकरा माराव्या लागतात. या विभागात अधीक्षक, भांडारपाल, लिपिक, पर्यवेक्षक आदी पदे गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहेत. मात्र असे असूनही रिक्त पदे भरण्याची तसदी शिक्षण विभागाकडून घेतली जात नाही.
महापालिकेच्या शाळेमध्ये ३०-३५ वर्षे ज्ञानदानाचे काम करूनही भविष्यासाठी साठवलेल्या पैशांसाठी शिक्षकांना शिक्षण विभागाचे दरवाजे ठोठावण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या निवृत्त शिक्षकांची पेन्शन सुरळीत सुरू आहे. मात्र, ‘पीएफ’ची फाईल पुढे गेली नसल्याने शिक्षकांना अजून किती काळ वाट पाहावी लागणार आहे, याचे उत्तर अनुत्तरीत आहे. सलग ३० ते ३५ वर्षे सेवा करूनही पैशांसाठी आम्हाला त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने आमचे पैसे त्वरित द्यावेत. अशी मागणी निवृत्त शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडून करण्यात येत आहे.
आठवड्यातून दोनदा माराव्या लागतात चकरा
गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून आम्ही शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून काम करत होतो. परंतु, अद्यापपर्यंत आम्हाला पीएफ मिळालेला नाही. त्यासाठी आठवड्यातून दोनदा आम्हाला महापालिकेत यावे लागत आहे. त्या पैशांच्या भरवशावर घर घेतले आहे. आम्ही आमच्या हक्काचेच पैसे मागत आहोत. संबंधित विभागाने ते लवकरात-लवकर देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी अनेक शिक्षकांनी केली आहे.
महापालिकेच्या शाळेतील निवृत्त मुख्याध्यापक व शिक्षकांच्या पीएफ संबंधित कामे करणारा कर्मचारी सुटीवर आहेत. तेथील जबाबदारी दुसºया कर्मचाºयांना देण्यात येणार आहे. त्यानंतर पीएफ संबंधित कामे लवकरात-लवकर केली जातील.
- प्रा. सोनाली गव्हाणे, सभापती, शिक्षण मंडळ, महापालिका