‘मनी लाॅन्ड्रिंग’मध्ये अटकेची भिती घालून एक कोटी १४ लाखांचा गंडा;सेवानिवृत्त महिलेची ऑनलाइन फसवणूक
By नारायण बडगुजर | Published: November 30, 2024 01:03 PM2024-11-30T13:03:53+5:302024-11-30T13:05:23+5:30
मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणी अटकेची भिती दाखवून एक कोटी १४ लाख २० हजार १८८ रुपयांची फसवणूक केली
पिंपरी :पोलिस अधिकारी असल्याची बतावणी केली. तुमच्या मोबाइल क्रमांकाच्या विरोधात तक्रारी प्राप्त झाल्या असल्याची भिती घातली. तसेच मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणी अटकेची भिती दाखवून एक कोटी १४ लाख २० हजार १८८ रुपयांची फसवणूक केली. सांगवी येथे २१ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने हा प्रकार घडला.
याप्रकरणी ६७ वर्षीय महिलेने पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून बालेणारे संशयित वेगवेगळ्या बँकेचे खातेधारकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीथक रवीकिरण नाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी कंपनीतून उच्च पदस्थ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेल्या फिर्यादी महिलेला संशयितांनी वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून संपर्क साधला. व्हाटस अप काॅल, व्हिडिओ काॅल केले.
पोलिस खात्यामधून तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या गणवेशात वेगवेगळ्या नावाने पोलिस अधिकारी व मुंबई पोलिस असल्याची बतावणी केली. फिर्यादी महिलेला त्यांच्या नावाने असलेल्या मोबाइल क्रमांकाच्या विरोधात गंभीर स्वरुपाच्या १७ तक्रारी असल्याची भिती घातली. तसेच नरेश गोयल मनी लाॅन्ड्रिंग केसमधील दोन करोड रुपयांच्या दरमहिना १० टक्के कमिशन म्हणून २० लाख रुपये मिळाल्याचे संशयितांनी फिर्यादी महिलेला सांगितले. याप्रकरणी तुम्हाला अटक करण्यात येईल, अशी भिती घालून संशयितांनी वेगवेगळ्या बँक खात्यांवर जबरदस्तीने एक कोटी १४ लाख २० हजार १८८.४० रुपये भरण्यास भाग पाडले. फिर्यादी महिलेने त्यासाठी त्यांच्याकडी बँक खात्यांमधील बचत ठेव, सेवानिवृत्तीची मिळालेली रक्कम संशयितांच्या खात्यांवर भरली. यात फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर फिर्यादी महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.
भारतीय न्याय संहिता कलम २०४, २०५, ३०८ (१), ३०८ (७), ३१८ (४), ३१६ (२), ३ (५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम (सुधारित) कायदा कमल २००८ चे कलम ६६ (सी), ६६(डी), अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक रवीकिरण नाळे तपास करीत आहेत.