नवीन वाहनांमुळे ४९ कोटींचा महसूल
By admin | Published: November 6, 2016 04:21 AM2016-11-06T04:21:48+5:302016-11-06T04:21:48+5:30
उद्योगनगरीत दिवाळीच्या मुहूर्तावर शहरवासीयांनी सुमारे १२ हजार दुचाकी, तीन हजार चारचाकी, खासगी बस, ट्रक, रिक्षा, टँकर मिळून सुमारे १६ हजार वाहनांची खरेदी केली आहे़
पिंपरी : उद्योगनगरीत दिवाळीच्या मुहूर्तावर शहरवासीयांनी सुमारे १२ हजार दुचाकी, तीन हजार चारचाकी, खासगी बस, ट्रक, रिक्षा, टँकर मिळून सुमारे १६ हजार वाहनांची खरेदी केली आहे़ वाहनांच्या खरेदीमुळे उपप्रादेशिक कार्यालयाला ‘वन टाइम टॅक्स’च्या माध्यमातून ३९ कोटींचा महसूल मिळाला आहे. इतर कर मिळून ४९ कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे़
दसरा ते दिवाळीचा मुहूर्त साधत उद्योगनगरीतील अनेकांनी दुचाकीच्या खरेदीला प्राधान्य दिले़ राज्यातील सर्वाधिक दुचाकींचे उत्पादक शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख आहे. दिवाळीच्या काळात श्रमीक नगरीत कोट्यवधीच्या बोनसचे वाटप होते. या काळात उत्पादक कंपन्यांकडून कामगार व ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खरेदीवर सवलतीची योजना आणली जाते. मुहूर्तावर खरेदीकडे नागरिकांचा कल असतो. त्यामुळे दस-यापासून नवीन वाहन खरेदी सुरू झाली होती.
नागरिकांनी नवीन वाहने खरेदी केली. त्यामुळे महिन्याभरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तिजोरीत तुलनेत जादा महसूल जमा झाला आहे़ १ ते ३१ आॅक्टोबर
दरम्यान या सर्व वाहनांची नोंद परिवहन कार्यालयात सुरू आहे. त्यामुळे शासनाकडे महसूल जमा
आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे
यांनी दिली़(प्रतिनिधी)
रहदारीचा प्रश्न
शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम नाही. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी पोहचण्यासाठी श्रमिकांना कसरत करावी लागते. त्यामुळे स्वत:चे वाहन खरेदी करण्यासाकडे कल वाढला आहे़ दरवर्षी शहरात खासगी वाहनांची संख्या वाढत आहे. यंदा नव्याने सुमारे १६ हजार वाहनांची भर पडली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढण्याबरोबच प्रदुषणातही वाढ होत आहे.