आळंदीतील जलस्रोतांचे पुनरुज्जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 03:04 AM2018-04-02T03:04:53+5:302018-04-02T03:04:53+5:30
तीर्थक्षेत्र आळंदीतील स्थानमाहात्म्य जोपासत येथील पुरातन जलकुंडांचे जलस्रोत पुनरुज्जीवित करण्याच्या मोहिमेला रविवारी सुरुवात करण्यात आली. या मोहिमेंतर्गत आळंदीतील भागीरथी कुंड, कोटी कुंड, रामकुंड आदी सुमारे ५१ पुरातन जलस्रोत कुंडांची स्वच्छता करण्यात येणार आहे.
आळंदी - तीर्थक्षेत्र आळंदीतील स्थानमाहात्म्य जोपासत येथील पुरातन जलकुंडांचे जलस्रोत पुनरुज्जीवित करण्याच्या मोहिमेला रविवारी सुरुवात करण्यात आली. या मोहिमेंतर्गत आळंदीतील भागीरथी कुंड, कोटी कुंड, रामकुंड आदी सुमारे ५१ पुरातन जलस्रोत कुंडांची स्वच्छता करण्यात येणार आहे. याबरोबरच इंद्रायणी नदीपात्रातील कचरा काढून इंद्रायणी नदी परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे येथील सर्वच जलस्रोत मोकळा श्वास घेणार आहेत.
या स्वच्छता मोहिमेस उपनगराध्यक्ष सागर भोसले यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. तसेच पुणे येथील गायत्री परिवाराच्या कार्यकर्त्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. या परिवाराचे शैलेंद्र पटेल यांनी इंद्रायणी नदीलगत असलेल्या रामकुंडासमोर जुने जलस्रोत तसेच त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी यंत्रणा विकसित करून भाविकांना शुद्ध तीर्थ पिण्यास सोयीचे व्हावे यासाठी संकल्प केला. या प्रसंगी आळंदीतील सामाजिक कार्यकर्ते सुरेश दौंडकर, सखाराम गवळी, दत्तात्रय काळे आदी उपस्थित होते.
गोपाळपुरातील पुरातन कुंड रस्तारुंदीकरण बाधित होऊ नये यासाठी परिसर स्वच्छ करून पुरातन कुंड परिसर मोकळा करण्यात आले. येथील झुडपे, वाढलेले गवत तसेच पालापाचोळा हटविण्यात आला. या वेळी उपनगराध्यक्ष सागर भोसले यांनी पुरातन वास्तू व कुंड हे तीर्थक्षेत्र आळंदीची जुनी ओळख असल्याने त्यांचे जतन केले जाईल असे सांगितले.
देहूनंतर आळंदीत नदीची स्वच्छता करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. या कार्याचा भाग म्हणून आळंदीतील इंद्रायणी नदीची तसेच पुरातन कुंडांची स्वच्छता सेवकांनी उत्साहात केली. या स्वच्छता मोहिमेत युवक तरुणाचा तसेच महिला सदस्यांचा प्रतिसाद मिळाला.
तीन वर्षांपासून नदी स्वच्छता मोहीम
गेल्या ३ वर्षांपासून देहू येथील इंद्रायणी नदीसह देहूतील नदीघाटाची स्वच्छता गायत्री परिवाराच्या वतीने राबविली जात आहे. याच मोहिमेत आता देहूप्रमाणे आळंदीला जोडण्यात येत असल्याचे पुणे गायत्री परिवाराचे आशिष यांनी सांगितले. दर महिन्यातील शेवटच्या रविवारी देहू आणि आळंदीत रोटेशन पद्धतीने स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची देहूप्रमाणे आळंदीत उत्साहात सुरुवात झाली. देहूत रानजाई प्रकल्पाचे सोमनाथ आबा यांचे मार्गदर्शन झाल्याचे आशिष यांनी सांगितले.
नदीपात्राने घेतला मोकळा श्वास
आळंदी येथील स्वच्छता मोहिमेत नदीपात्रातील कचरा, कपडे, प्लॅस्टिक बाटल्या, पिशव्या, जीर्ण फोटो फ्रेम्स, काचा, फुलांचे निर्माल्य आदी दाताळ्यांचा वापर करून बाहेर काढण्यात आले. या मोहिमेत सुमारे एक हजार किलोवर कचरा नदीपात्रातून बाहेर काढून नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाकडे घंटागाड्यातून देण्यात आले.