‘लय भारी गेम शो’ने आनंद द्विगुणित
By admin | Published: October 12, 2016 02:05 AM2016-10-12T02:05:39+5:302016-10-12T02:05:39+5:30
खास नवरात्रोत्सवानिमित्त लोकमत सखी मंच व कात्रज दूध यांच़्या वतीने महिलांसांठी लय भारी गेम शो घेण्यात आला. महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने लय भारी गेम
पिंपरी : खास नवरात्रोत्सवानिमित्त लोकमत सखी मंच व कात्रज दूध यांच़्या वतीने महिलांसांठी लय भारी गेम शो घेण्यात आला. महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने लय भारी गेम शोच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाल्याचा आनंद महिलांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. या कार्यक्रमाने नवरात्रोत्सवात महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देत उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
निगडीतील यमुनानगर व रुपीनगर येथील गुरुदत्त हौसिंग सोसायटीमध्ये लय भारी गेम शो झाला. स्त्रीशक्तीला अभिवादन करूनच कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या वेळी महिलांसाठी विविध मनोरंजक खेळ घेण्यात आले. त्यामध्ये रस्सीखेच, तळ्यात-मळ््यात, बॉल बकेटमध्ये टाकणे, केसात स्ट्रॉ माळणे आदी खेळ घेण्यात आले. खुर्चीत बसून फुगा फोडणे या सासू-सून जोडीच्या खेळ स्पर्धेत प्रथमच सून आणि सासरेबुवा यांची जोडी पाहायला मिळाली. या वेळी सहभागी सासऱ्यांनी सुनेसाठी या स्पर्धेत सहभाग घेतल्याचे सांगितले. तसेच, स्पर्धक सासूंच्या जोडीला टक्कर देत सून-सासरे यांच्या जोडीने प्रथम क्रमांक पटकाविला. यानंतर पिठातून चॉकलेट शोधून काढणे या स्पर्धेत तर स्पर्धकाचा पिठाने भरलेला चेहरा बघण्यासारखा झाला होता. या अवतारातच त्यांनी केलेला रॅम्प वॉकही मजेशीर ठरला. प्रत्येक स्पर्धेत महिलांनी उत्साहाने, जोशाने आपला सहभाग नोंदविला. सूत्रसंचालकाच्या हजरजबाबी व उत्कृष्ट संवादकौशल्याने महिला खेळातील जिंकणे-हारणे, रुसवा-फुगवा विसरून खेळाचा मनसोक्त आनंद घेत होत्या. कार्यक्रमाच्या अखेर लकी ड्रॉ कुपन घेण्यात आले.
नवरात्रीच्या नऊ दिवस घेतलेल्या लय भारी गेम शोचा हा अंतिम टप्पा यशस्वीरीत्या पार पडला. नऊ दिवस शहरातील विविध सोसायट्यांमध्ये जाऊन महिलांसाठी विविध कार्यक्रम घेतले. प्रत्येक सोसायटीमध्ये महिलांचा भेटणारा प्रतिसाद भारावून टाकणारा होता. (प्रतिनिधी)