भांडणाची तक्रार देण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकाचा म्हाळुंगेत खून
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 07:50 PM2019-07-27T19:50:59+5:302019-07-27T19:52:27+5:30
ओळखीच्या व्यक्तिशी झालेल्या भांडणाची तक्रार देऊन येतो, असे सांगून घरातून गेलेल्या रिक्षाचालकाचा खून झाला. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह म्हाळुंगे येथील शितळादेवी नगर परिसरात मिळून आला.
हिंजवडी : ओळखीच्या व्यक्तिशी झालेल्या भांडणाची तक्रार देऊन येतो, असे सांगून घरातून गेलेल्या रिक्षाचालकाचा खून झाला. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह म्हाळुंगे येथील शितळादेवी नगर परिसरात मिळून आला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार तानाजी कसबे (वय २८, रा. म्हाळुंगे) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी राणी कुमार कसबे (वय २५, रा. म्हाळुंगे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार राकेश महेंद्र सोस्टे (वय ४४, रा. बाणेर) व त्यांच्या साथीदांरा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
कुमार कसबे रिक्षाचालक होते. त्यांची व राकेश सोस्टे याची ओळख होती. शनिवारी (दि. २०) रात्री नऊच्या सुमारास कुमार कसबे दुचाकीवरून कामानिमित्त बाहेर गेले होते. ते दुसऱ्या दिवशी दुपारी घरी परतले. याबाबत पत्नी राणीनी विचारले असता, बाणेर येथे राकेश बरोबर माझे भांडण झाले आहे. त्याने व त्याच्या साथीदारांनी मला मारहाण करून रात्रभर डांबून ठेवले होते. माझ्या डोक्यात मुंग्या येत आहेत, मी त्याच्या नावाची तक्रार द्यायला जाणार आहे, असे कुमार यांनी पत्नी राणी यांना सांगितले. पत्नी राणी यांच्याकडून चिकन आणण्यासाठी ५०० रुपये घेऊन रविवारी (दि. २१) साडेचार वाजता ते घरातून गेले. ते रात्रभर घरी परतले नाही, मात्र त्यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि. २२) म्हाळुंगे येथील शितळादेवी नगर परिसरात मिळून आला. हिंजवडी पोलीस तपास करत आहे.