नियमांची वाट लावतोय रिक्षावाला
By admin | Published: December 8, 2015 12:02 AM2015-12-08T00:02:37+5:302015-12-08T00:02:37+5:30
पिंपरी-चिंचवड शहर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्षांची वाहतूक सुरू आहे. चालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्षांची वाहतूक सुरू आहे. चालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. मनमानी पद्धतीने भाडेआकारणी केली जाते. नियमापेक्षा जादा प्रवाशांची वाहतूक केली जाते. पण या प्रकाराकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांची अरेरावी वाढली आहे. त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
रावेत परिसरातील रावेत बीआरटी मुख्य चौक, शिवाजी चौक, वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा चौक, आकुर्डी रेल्वे स्टेशन, रेल विहार बिजलीनगर आदी भागांत असणाऱ्या रिक्षास्थानकावरील रिक्षाचालक मनमानीनुसार प्रवाशांकडून भाडे आकारतात. प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यात शाब्दिक बाचाबाची पाहावयास मिळते. वाल्हेकरवाडी ते चिंचवड हे अंतर साधारणत: दोन ते अडीच किमी असताना नियमानुसार मीटरप्रमाणे २९.६२ रुपये एवढे भाडेआकारणी अपेक्षित आहे. रिक्षाचालकाने मात्र प्रवाशांकडे ६०-७० रुपयांची मागणी केली. मीटरची विचारणा केली असता अरेरावीची भाषा वापरून दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. बिजलीनगर रेल विहार चौक ते निगडी मीटरप्रमाणे भाडेआकारणी ३०-३५ रुपये होत असताना येथे मात्र प्रवाशांकडे ८० रुपयांची मागणी केली जाते. हीच अवस्था या मार्गावर पाहावयास मिळते. आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूंस असणाऱ्या रिक्षाथांब्यावरून रावेत, आकुर्डी, वाल्हेकरवाडी परिसरात जाण्याकरता १०० व त्यापेक्षा अधिक रकमेची मागणी केली. परिसरातील अनेक मार्गांवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव असल्यामुळे रिक्षाचालक भाड्याकरता मनमानी करतात. रात्रीच्या वेळी हेच दर दुप्पट-तिप्पट होतात. कोणत्याही रिक्षास्थानकावर रिक्षाचालक गणवेश घालत नसल्याचे आढळले.
चिंचवड : असभ्य वर्तन, मनमानी भाडे, वाहतूक नियमांची पायमल्ली करत ‘हम करे सो कायदा’ या आविर्भावात असणारे रिक्षाचालक प्रवाशांची लूट करत असल्याचे वास्तव चिंचवड परिसरात दिसत आहे. दळवीनगरमधील भाजी मंडईजवळ असणाऱ्या रिक्षा स्टँडवर नेहमीच हुल्लडबाजी सुरू असते. येथील एकाही चालकाच्या अंगावर वर्दी नसते. अल्पवयीन मुले रिक्षा चालवत आहेत. बहुतांशी जणांकडे हम करे सो कायदाबक्कल नंबर व वाहन परवाना नाही. चिंचवड रेल्वे स्टेशन समोरही रिक्षाचालक मनमानी पद्धतीने भाडे आकारत आहेत. बाहेरगावातून आलेल्या प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे घेतले जाते. मीटर पद्धत ही वापरात नाही. दोन किलोमीटर प्रवासासाठी ५० रुपये मागितले जातात. रात्रीच्या वेळी तर प्रवाशांकडून जास्त भाडे आकारले जाते. पुणे-मुंबई महामार्गावर तर वाटेल तिथे रिक्षा उभ्या केल्या जातात. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून जास्त पैसे कमावण्याचा धंदा जोमात सुरू आहे. चिंचवड गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लांबलचक रिक्षांच्या रांगा लागलेल्या असतात. स्टँडवर किती रिक्षा उभ्या असाव्यात, याचे नियम पाळले जात नाहीत. चिंचवडगाव, थेरगावपर्यंत प्रवासी वाहतूक केली जाते.
पोलिसांच्या आशीर्वादाने नियम धाब्यावरभोसरी शहरातील प्रत्येक भागात तीनआसनी व सहाआसनी रिक्षांचा सुळसुळाट सुरू आहे. जवळपास सर्वच रिक्षा अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्याचे चित्र आहे. कोणताही रिक्षाचालक मीटरप्रमाणे पैसे घेत नाही. शिवाय रिक्षा चालवताना पाळावयाच्या नियमांना बगल देऊन राजरोसपणे परमिट नसताना गाडी चालवली जाते. परमिट असेल, तर परमिटच्या सर्व नियमांना बगल दिली जाते. याला जेवढा जबाबदार रिक्षाचालक, तेवढेच जबाबदार पोलीस आहेत. सर्व नियम कागदावर ठेवून शहरात होणारी अवैध रिक्षा वाहतूक पोलिसांच्याच ‘लेनदेन’मुळे राजरोसपणे सुरू आहे.
पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, वाकड, नाशिक फाटा, तसेच शहरातील अनेक भागांतून तीनआसनी व सहाआसनी रिक्षा प्रवासी वाहतूक करीत आहेत. यातील बहुतांश रिक्षांचा भोसरीत वावर असतो. आरटीओच्या नियमाप्रमाणे ज्या रिक्षांना परमिट आहे. त्याच रिक्षांना प्रवासी वाहतूक करता येते. शिवाय प्रत्येक रिक्षाचालकाने खाकी गणवेश घालून बिल्ला लावला पाहिजे. मात्र यातील कोणताच नियम पाळला जात नाही. भोसरीतून आळंदी रस्ता, संत ज्ञानेश्वर मंडई, लांडेवाडी चौक, छत्रपती शिवाजी चौक, भोसरी उड्डाणपूल हे रिक्षाचे प्रमुख थांबे आहेत. भोसरीत तीन व सहाआसनी रिक्षा एक हजारच्या वर आहेत. या शहराच्या सर्व भागात प्रवासी वाहतूक करीत आहेत. यातील अनेक रिक्षाचालकांनी अवैध प्रवासी वाहतूक केल्याशिवाय रिक्षा वाहतूक करूच शकत नाही, असे सांगून सर्वांचे हप्ते ठरलेले असतात. मालकाला द्यावे लागणारे दररोजच्या शिफ्टचे पैसे व पोलिसांना द्यावा लागणारा हप्ता यामुळे अवैध वाहतूक करावी लागते, असे अनेकांचे म्हणणे आहे.