‘रिंग’वरून भाजपात दुही, चारशे कोटींच्या निविदा प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 03:08 AM2018-01-28T03:08:48+5:302018-01-28T03:08:55+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेने मंजूर केलेली ४२५ कोटींच्या रस्ते विकासकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार अमर साबळेंसह शिवसेनेचे खासदार आणि राष्टÑवादीच्या पदाधिकाºयांनी केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेने मंजूर केलेली ४२५ कोटींच्या रस्ते विकासकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार अमर साबळेंसह शिवसेनेचे खासदार आणि राष्टÑवादीच्या पदाधिकाºयांनी केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणावरुन भाजपात दुही निर्माण झाली आहे. भाजपाच्या खासदार साबळे आणि स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांच्यात जुंपल्याने त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बोलावलेली बैठक तूर्तास रद्द केली आहे. प्रमुख पदाधिकारी परदेश दौºयावर असल्याने बैठक रद्द केल्याचे समजते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षात जुगलबंदी सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. चारशे पंचवीस कोटींचे प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात पोहोचले आहे. विविध विकासकामात गैरव्यवहार होत असल्याचे, आरोप विरोधकांबरोबरच सत्ताधा-यांनीही केला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला तडा जात असल्याचे भाजपा पदाधिकाºयांना मुख्यमंत्र्यांना साकडे घातले होते. सत्ताधाºयांसह याप्रकरणात आयुक्तांवर देखील गंभीर आरोप होत आहेत. खासदारांच्या पत्राची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी रस्ते विकासाच्या कामाचा अहवाल मागविला आहे. खासदारांनी चौकशीची मागणी केल्यामुळे स्थायी समिती अध्यक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर, दुसरीकडे खासदार समर्थकांनी सावळे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
भाजपाच्या पदाधिकाºयांमध्येच चांगली जुंपली आहे. याबाबत झाडाझडती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर आज रात्री बैठक बोलविली होती. परंतु, अचानक ती बैठक रद्द करण्यात आली आहे. एक प्रमुख पदाधिकारी परदेश दौºयावर आहे. त्यामुळे तूर्तास बैठक पुढे ढकलली आहे.
निष्ठावान भेटणार मुख्यमंत्र्यांना
- पिंपरी-चिंचवडमध्ये निष्ठावान विरुद्ध पक्षातील नवीन असा वाद पुन्हा उफाळला आहे. खासदारांच्या राजीनाम्यामुळे निष्ठावान गट अधिक आक्रमक झाला असून, आगामी काळात निष्ठावान पदाधिकारी स्वतंत्रपणे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत, असे विश्वसनीयरीत्या समजते.
- भाजपाच्या निष्ठावान पदाधिकाºयांची, खासदार समर्थकांची शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास निगडीत गुप्त बैठक झाली. बैठकीत निष्ठावान कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले होते. मुख्यमंत्र्यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन पालिकेत गैरव्यवहार होत असल्याचे आरोप पक्षावर होत आहेत. तसेच पालिकेतील काही अधिकारी गैरव्यवहाराला हातभार लावत असून, या सर्वांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यानच्या काळात, भाजपाच्या पक्ष संघटनेत फेरबदल केले. खासदार समर्थकास संघटन सरचिटणीस या महत्त्वाच्या पदावरून जबाबदारीमुक्त केले. जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याने मुख्यमंत्र्यांना निष्ठावान कार्यकर्ते भेटणार आहेत.