लोंबकळत्या वीजतारांचा धोका, महावितरण कंपनी व महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:15 AM2018-08-17T00:15:15+5:302018-08-17T00:18:36+5:30
पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असताना उपनगरातील विजेच्या तारा मात्र ठिकठिकाणी लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत.
रावेत - पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असताना उपनगरातील विजेच्या तारा मात्र ठिकठिकाणी लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. पुनावळे उपनगरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ठिकठिकाणी विजेचे खांब वाकले आहेत, तसेच ताराही लोंबकळल्या आहेत. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत असल्याचे दिसते. नागरिकांकडून वारंवार लेखी व तोंडी तक्रारी केल्यानंतरही महावितरण याची दुरुस्ती करण्यास उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील ही गंभीर परिस्थिती पाहता ‘महावितरण टपलंय जिवावर’ असेच म्हणण्याची वेळ आली आहे. महावितरण मात्र याची गांभीर्याने दखल घेत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. वारंवार परिसरात विद्युत तारांच्या घर्षणामुळे शॉर्ट सर्किट होऊन वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. आता या वाहिन्या भूमिगत नसल्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण व वारंवार होणारे अपघात यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याचबरोबर धोकादायक तारा लगत असलेल्या इमारतीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांना याचा त्रास होत आहे.
शहरात सर्वत्र महावितरणने विजेच्या तारा भूमिगत केल्या आहेत. परंतु अद्यापपर्यंत पुनावळे, माळवाडी, ताजणे वस्ती, ढवळे वस्ती, दर्शले वस्ती, कुंभार वस्ती आदी ठिकाणी आजही तारांचे जाळे खांबावरच पहावयास मिळत आहे. त्यामुळे परिसरात अनेक वेळा उच्च दाब निर्माण होऊन घरातील विजेची उपकरणे जळली आहेत.
याबाबत नागरिकांनी महावितरणकडे केबल भूमिगत करण्यासाठी वारंवार विनंती करूनसुद्धा यामध्ये काहीच बदल झालेले दिसून येत नाही. महावितरण अधिकाºयांच्या हलगर्जीपणाच आता नागरिकांच्या जिवावर बेतण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघात घडण्यापूर्वीच अधिकाºयांनी सर्व दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे.
दरम्यान, परिसरातील
वाकलेले खांब, लोंबकळलेल्या तारा दुरुस्तीसह रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी ठेकेदार नेमले आहेत. परंतु अधिकाºयांना हाताशी धरून हे ठेकेदार कामच करीत नसल्याचे दिसते. केलेली कामेही दर्जेदार
होत नसल्यानेच समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अधिकाºयांनी
या समस्यांकडे लक्ष देऊन परिसरातील वीजवाहक तारा भूमिगत
कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तक्रार : महापालिका प्रशासनाकडे निवेदन
शहरातील विविध ठिकाणच्या वीजवाहक तारा भूमिगत केल्या आहेत, मग आमच्या येथीलच का नाही याबाबत नागरिकांनी लोंबकळलेल्या तारांविषयी भूमिगत करण्यासाठी महावितरण प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, त्यांनी तक्रारींना केराची टोपलीच दाखवली. तक्रारीचा काही एक उपयोग झाला नाही. मुख्य रस्त्यांवर अनेक मोठ्या चौकांमध्ये, तसेच अंतर्गत रस्त्यावर या लोंबकळणाºया तारा नजरेस पडतात. एखाद्या मोठ्या गाडीत अडकून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- प्रदीप दर्शले, उपाध्यक्ष, चिंचवड विधानसभा, राष्ट्रवादी काँग्रेस
जुन्या तारा झाल्या जीर्ण
पुनावळे येथील बहुतांश भागातील तारा अनेक वर्षांपासून बदलण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे त्या जीर्ण झाल्या आहेत. याचा परिणाम थोडेही वारे आले किंवा पाऊस आला की त्या तुटून पडतात.
धोकादायक बॉक्स
अनेक ठिकाणी वीजपुरवठा करणारे वायरचे बॉक्स उघडे आहेत. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. माळवाडीसह पुनावळे परिसरात धोकादायक बॉक्स पहावयास मिळतात.
रोहित्रांना वेलीचा विळखा
पुनावळे परिसरात ठिकठिकाणी रोहित्रे आहेत. परंतु महावितरणच्या दुर्लक्षामुळे बहुतांश रोहित्रांवर वेलींचा विळखा पाहावयास मिळतो. यामुळे वीजपुरवठ्यात अडचणी येत आहेत.
कोट्यवधींचा निधी खर्च
दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही येथील परिस्थिती जैसे थेच असल्याचे दिसते.