औद्योगिक वापराच्या बर्फामुळे धोका; अन्न व औैषध प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 02:55 AM2019-03-14T02:55:36+5:302019-03-14T02:55:46+5:30
रसवंतीगृह तसेच कुल्फीवाल्यांकडून सर्रास वापर
रावेत : उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा, यासाठी उसाचा रस, आइस्क्रीम, बर्फाचे गोळे, फळांचा रस त्यात होणारा बर्फाचा वापर तसेच बर्फापासून तयार होणारे खाद्यपदार्थ याची मागणी वाढली आहे. त्यामुळे साहजिकच बर्फाची मागणीही वाढली आहे. परंतु सर्रासपणे औद्योगिक वापराचा बर्फ खाद्यपदार्थांमध्ये वापरला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
मार्च महिना सुरू झाल्याने उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. रसवंती तसेच विविध खाद्य पदार्थांसाठी वापरण्यात येणाऱ्या बर्फ कारखान्यातून बर्फवाटप करताना सर्रासपणे बर्फ रसवंती तसेच थंड पेयांच्या दुकानांपुढे जमिनीवर टाकला जातो तेथून नागरिक, वाहने जातात तरीदेखील नागरिक थंड पेय पिताना दिसून येतात. परंतु व्यावसायिकांकडून बर्फ खरेदी करून आणल्यानंतर योग्य पद्धतीने हाताळणी होत नसल्याचे दिसून येत आहे. बर्फाची वाहतूक करीत असताना कुठे सायकलने तर कुठे घाणेरड्या वाहनांचा वापर करण्यात येत आहे. त्यासोबत बर्फ कोणत्या पाण्याने तयार होतो, ते पाणी शुद्ध आहे की नाही. याबाबत काहीही माहिती नसते. रसवंती गृह, तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे आढळून येणारा बर्फ हा खाण्याचा बर्फ नसतोच. औद्योगिक वापरासाठीचा हा बर्फ खाणे आरोग्यास अपायकारक ठरू शकते. अन्न व औषध प्रशासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेऊन अशा प्रकारे खाद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे.
अनेक ठिकाणी व्यावसायिकांकडून बर्फ उघड्यावरच ठेवण्यात येत असतो. त्यामुळे रस्त्यावरील धूळ तसेच विषाणूंचा त्यावर प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. व ते पेय पिल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन आजारांना आमंत्रण मिळत आहे. सध्या रसवंती, लिंबू सरबत, जूस सेंटर, आइस्क्रीम, फळविक्रेते, कुल्फीवाले आदींची दुकाने रस्त्याच्या कडेला थाटलेली दिसून येतात. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांची पावले आपोआप थंड पेयाच्या दुकानांकडे वळलेली पहावयास मिळत आहेत. रस असो वा लिंबूसरबत या सर्वांमध्ये बर्फाचा वापर वाढत आहे. त्यामुळे हा बर्फ खाणे आरोग्यास अपायकारक ठरू शकते.