रेल्वे रुळ ओलांडताना जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 01:24 AM2018-08-29T01:24:39+5:302018-08-29T01:25:08+5:30
वडगाव मावळ रेल्वे स्थानक : केशवनगर, सांगवी परिसरातील नागरिकांची होतेय गैैरसोय
वडगाव मावळ : केशवनगर आणि सांगवी परिसरातील नागरिकांना वडगाव मावळ रेल्वे स्थानकावर येण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडावा लागतो. ही बाब अत्यंत धोकादायक आहे. या ठिकाणी पादचारी पूल उभारून नागरिकांची सोय करण्याऐवजी याठिकाणी नवनवीन क्लृप्त्या वापरून प्रवाशांची आणि नागरिकांची गैरसोय करण्याचा प्रकार रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे. या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांना, तसेच केशवनगर परिसरातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
केशवनगर भागातील नागरिकांना वडगावच्या मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी सुमारे दोन किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. रस्त्याने जाण्यासाठी खूप वेळ लागत असल्याने नागरिक जवळचा मार्ग म्हणून वडगाव रेल्वे स्थानकाकडून जाणे पसंत करतात. तसेच केशवनगर भागातील नागरिकांना रस्त्याने रेल्वे स्टेशनवर यायचे असेल, तर सुमारे दोन किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. हे अंतर खूप लांब आहे. त्याऐवजी रेल्वे प्रशासन आणि नगर पंचायतीच्या माध्यमातून एक पादचारी पूल उभारल्यास हे अंतर कमी होऊन अगदी ५०० मीटर एवढेच होईल. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या ठिकाणी पादचारी पूल उभारल्यास नागरिकांची, तसेच प्रवाशांची सोय होऊ शकते. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. मध्यंतरी मध्य रेल्वेचे आॅटो सिग्नलिंगचे काम सुरू असताना वडगाव मावळ येथील रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूंनी खोल खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. तसेच रेल्वे प्रवासी ज्या मार्गाने जातात, त्या मार्गावर मोठमोठी काट्यांची झाडे तोडून टाकण्यात आली असून, एक बॅरिकेड लावण्यात आले आहे. त्यामुळे केशवनगर भागातील नागरिक आणि रेल्वे प्रवासी रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत आहेत. सोय उपलब्ध करून देण्याऐवजी नागरिकांची गैरसोय करणाऱ्या प्रशासनाला कोण जाग आणणार, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. याबाबत वडगाव-कातवी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयूर ढोरे म्हणाले, ‘‘केशवनगर भागातील नागरिकांना केशवनगर ते मंडई असा जोडणारा पादचारी पूल हवा असेल, तर त्याबाबत नागरिकांनी नगरपंचायतीला अर्ज द्यावा. त्यानंतर ठराव करून नगरपंचायतीच्या वतीने रेल्वे प्रशासनाला अर्ज दिला जाईल. सध्या असलेल्या रस्त्यावर भुयारी पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे रुळ न ओलांडता त्या मार्गाने यावे. सध्या त्याबाबत कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.’’
रेल्वे प्रशासन : सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
केशवनगर भागातील विद्यार्थी शाळेसाठी वडगाव बाजारपेठेच्या बाजूला जातात. बाजारपेठेकडे जाताना जवळचा मार्ग म्हणून विद्यार्थीसुद्धा रेल्वे रुळ ओलांडणेच पसंत करतात. यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे रूळ ओलांडणे धोक्याचे आणि बेकायदा असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात येते, तर दुसरीकडे प्रवाशांच्या सुविधेकडे दुर्लक्ष करून त्यांची गैरसोय केली जाते. तीन किलोमीटर घालाव्या लागणाºया वळसा मार्गावर खासगी वाहने, पीएमपी बस असे अनेक पर्याय उपलब्ध असताना आम्ही रेल्वेकडे का जावे असाही प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.