रस्त्यावरील अपघात टळणार, रोड दुरुस्तीमुळे वाहनचालकांमधून समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 01:21 AM2018-11-17T01:21:16+5:302018-11-17T01:21:47+5:30
कॅन्टोन्मेंट हद्दीतील देहूरोड ते झेंडेमळा दरम्यान केंद्रीय आॅर्डनन्स डेपोच्या (सीओडी) प्रवेशद्वारापर्यंतचा
देहूरोड : लष्करी हद्दीत अशोकनगर-चिंचोली ते झेंडेमळा दरम्यानच्या रस्त्यावर पडलेल्या लहान-मोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण दूर करण्याबाबत प्रशासन ढिम्म होते. गेल्या सहा महिन्यांत स्थानिक नागरिक, लष्करी जवान, अधिकारी, तळवडे आयटी पार्कमधील अभियंते व वाहनचालकांची मोठी गैरसोय होत होती. याबाबत लोकमतने वारंवार सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर लष्करी अभियंता कार्यालयाकडून शुक्रवारी दुपारनंतर रस्त्यावरील लहान-मोठे खड्डे बुजवून रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे.
कॅन्टोन्मेंट हद्दीतील देहूरोड ते झेंडेमळा दरम्यान केंद्रीय आॅर्डनन्स डेपोच्या (सीओडी) प्रवेशद्वारापर्यंतचा रस्ता देहूरोड लष्करी अभियांत्रिकी विभागाच्या (एमईएस) ताब्यात असून, त्यांच्यामार्फत देखभाल व दुरुस्ती करण्यात येते. दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने या रस्त्यावर विविध ठिकाणी धोकादायक खड्डे पडले होते. रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत लोकमतने ‘प्रशासनाला सद्बुद्धी दे’ या शीर्षकाने छायाचित्रासह सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. या रस्त्यावर चिंचोलीतील शनिमंदिर ते आर्मी स्कूल दरम्यानच्या एक किलोमीटर भागात दोनशेहून अधिक खड्डे पडले होते.
मावळ तालुक्यातही अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभागानेही रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
वाहनचालकांमधून समाधान
कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे नागरिकांनी तक्रार केली होती. त्यातच या रस्त्यावर अंधार असल्याने वाहनचालकांना नाइलाजास्तव खड्ड्यात वाहन घालावे लागत होते. वारंवार अपघात होत होते. याची दखल घेत लष्करी प्रशासनाने रस्त्याची दुरुस्ती सुरू केली असून, नागरिकांनी समाधान व्यक्त करीत ‘लोकमत’ला धन्यवाद दिले आहेत.