वाहनांमध्ये हरवला रस्ता
By admin | Published: June 6, 2016 12:25 AM2016-06-06T00:25:35+5:302016-06-06T00:25:35+5:30
वाहनतळ आहे; मात्र त्यासाठीची जागा अपुरी पडत असल्याने कार्यालयासमोरील सेवा रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने रस्ताच हरविला असल्याची स्थिती निगडी प्राधिकरणातील
निगडी : वाहनतळ आहे; मात्र त्यासाठीची जागा अपुरी पडत असल्याने कार्यालयासमोरील सेवा रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने रस्ताच हरविला असल्याची स्थिती निगडी प्राधिकरणातील ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयासमोर असते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे निगडी, प्राधिकरणातील संत ज्ञानेश्वर चौकात ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय आहे. या कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक ८, १०, १४ ते १९, २५ ते २७ हे प्रभाग येतात. विविध कामांनिमित्त कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची संख्याही अधिक आहे. बहुतेक नागरिक वाहन घेऊन येतात. यासह कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचीदेखील वाहने असतात. मात्र, या कार्यालयाच्या वाहनतळात अवघ्या पाच ते सात मोटारी अन् सुमारे ११० दुचाकी उभ्या राहू शकतील, इतकीच क्षमता आहे. त्यामुळे ही जागा अपुरी पडत आहे. कार्यालयाच्या समोरील बाजूस इमारतीपासून सीमाभिंतीपर्यंत २० फुटांपर्यंतचा मोकळा परिसर नागरिकांना येण्या-जाण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी ठेवण्यात आला आहे. मात्र, या जागेतही वाहने उभी केली जात आहेत.
कार्यालयाला भव्य प्रवेशद्वार आहे. मात्र, या प्रवेशद्वारापासून अवघ्या दोन फूट अंतरावर वाहने उभी करण्यासाठी पिवळ्या रंगाने आखणी केलेली आहे. केलेल्या आखणीनुसार चारचाकी वाहन उभे केल्यास इतर वाहनांना प्रवेशद्वारातून आत येणे कठीण होते. तसेच कार्यालयाच्या सीमाभिंतीला लागूनच सेवारस्ता सुरू होतो. त्यानंतर मुख्य रस्ता आहे. कार्यालयात येणारया नागरिकांना वाहन उभे करण्यास जागा नसल्याने या सेवा रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. सेवा रस्त्यासह पदपथावरही दुचाकींच्या रांगा लागतात. त्यामुळे सेवारस्ता आणि पदपथ या दोन्हींचा वापर करणे शक्य होत नाही.
सध्याची वाहनतळाची जागा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठीही पुरत नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांना जागा मिळणे तर कठीणच, अशी स्थिती आहे. त्यामुळे रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो. (वार्ताहर)