आंदर मावळातील पारीठेवाडी साकव पुलाचा रस्ता खचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 04:09 PM2018-08-04T16:09:45+5:302018-08-04T16:10:24+5:30
पारीठेवाडी येथील साकव पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता खचल्याने येथून प्रवास करणे धोकादायक झाले आहे.
कामशेत : आंदर मावळातील कुणे, अनसुटे, पिंपरी, तळपेवाडी, माळेगाव खुर्द, माळेगाव बुद्रुक, मेटलवाडी, गोंटेवाडी, आडारवाडी, सावळा आदि आदिवासी गावांना जोडणारा पारीठेवाडी येथील साकव पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता खचल्याने येथून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. दोन्ही बाजूला झालेल्या चिखलात दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. तर चारचाकी वाहने पुलाच्या सुरुवातीच्या बाजूला आदळून वाहनांचे नुकसान होत आहे. येथील आदिवासी बांधव व विद्यार्थ्यांना चालणे अवघड झाले आहे. पुलाच्या पुढे शासकीय आश्रम शाळा माळेगाव आणि भैरवनाथ माध्यमिक विद्यालय माळेगाव या दोन विद्यालय असून विद्यार्थ्यांना येथून प्रवास करणे अवघड झाले आहे.
आंदर मावळातील किवळे ते सावळा या अठरा किलोमीटरचा रस्ता ग्रामसडक योजने टप्पा क्र. १ अंतर्गत २०१४ साली नोव्हेंबर मध्ये सुरुवात झाली. त्याअंतर्गत रस्त्याचे पूर्णपणे नुतनीकरण करण्यात आले. पूर्वी हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत होता. या रस्त्याच्या आजूबाजूला असलेली गावे हि सर्व आदिवासी वस्तीची असल्याने केंद्रीय आदिवासी निधी अंतर्गत या रस्त्याच्या कामाला खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्यामुळे सुरुवात झाली, अशी माहिती शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडभोर यांनी दिली.
या परिसरातील पारीठेवाडी इंगळून ग्रामपंचायतीच्यामध्ये कुणे अनसुटे भागातील नाला ओढ्याचे पाणी रस्त्यावर येत असल्याने २०१६-१७ मध्ये येथे साकव पूल मंजूर झाला. सदरचे काम वेळेत होऊ न शकल्याने तसेच पुलाचे काम पूर्ण झाले मात्र पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर डांबरीकरण करणे गरजेचे असताना ते केले गेले नाही. त्यात पुलाच्या दोन्ही बाजूला मातीच्या भरावाचा रस्ता केल्याने ऐन पावसात मोठ्या प्रमाणात चिखल होऊन वाहतुकीस अडथला निर्माण झाला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूकडील चिखलाचा रस्ता खचला असून पादचारी पाय घसरून पडत आहेत. तर दुचाकी वाहने घसरून अपघात घडत आहेत. चारचाकी वाहने येथून प्रवास करताना खड्यांमध्ये आदळून त्यांचे नुकसान होत आहे.