रस्ता सुरक्षा सप्ताहाची वाट
By admin | Published: January 10, 2017 02:56 AM2017-01-10T02:56:23+5:302017-01-10T02:56:23+5:30
केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने २८ वा रस्ते सुरक्षा सप्ताहाची घोषणा करण्यात आली. आजपासून या
पिंपरी : केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने २८ वा रस्ते सुरक्षा सप्ताहाची घोषणा करण्यात आली. आजपासून या सप्ताहाला सुरुवात होत आहे. येथील भर रस्त्यात पडलेले बॅरिकेट, जागृतीफलक पाहून मात्र शहरात या सप्ताहाची पहिल्याच दिवशी ‘ऐशी की तैशी’ झाल्याचे पाहायला मिळाले.
वाहतूककोंडी, वाढते अपघात यांना आळा घालण्यासाठी केंद्र शासनच्या वतीने ९ ते १५ जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. सकाळी काही काळ वाहतूक पोलिसांकडून सिग्नलला उत्तम वाहतूक नियमन केले जात होते. मात्र पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये दुपारच्या वेळी वाहतूक नियमनासाठी वापरण्यात येणारे बॅरिकेट भर चौकात अस्ताव्यस्तपणे पडले होते.
तसेच या सप्ताहाच्या निमित्ताने वाहतूक नियम व सुरक्षेविषयी जनजागृती करणारा फलकदेखील तुटलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे वाहनचालकांचा या चौकात गोंधळ उडत होता. सुरक्षा सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी वाहतूक पोलिसांच्या साहित्याची ही अवस्था पाहून वाहनचालकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात होते. तसेच रस्त्यावर पडलेल्या बॅरिकेटमुळे अनेक दुचाकीचालक गडबडले.
अनेक वेळ हे साहित्य रस्त्यावरच पडून होते.
एरवी रस्ता सुरक्षा सप्ताह आला की, सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागते; पण यंदा हा सप्ताह सुरू असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. त्यामुळे या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी वाट लावण्यात आली, अशी टीका परिसरातील नागरिकांमधून होत आहे. प्रशासनाला नेमकी जाग कधी येणार? असा प्रश्न विचारला जात आहे.(प्रतिनिधी)
केवळ सप्ताहावेळीच तत्परता
आज सकाळपासून निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात सुमारे चार ते पाच वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियमन केले जात होते. झेब्रा क्रॉसिंगच्या मागे वाहने थांबविण्यास सांगितले जात होते. त्यामुळे आज येथून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे सोपे जात होते. मात्र केवळ मंत्री आल्यानंतर किंवा वाहतूक सप्ताहावेळीच वाहतूक पोलिसांकडून इतके तंतोतंत वाहतुकीचे नियमन केले जाते.
इतर वेळी मात्र केवळ वाहनांवर कारवाई करण्यातच धन्यता मानली जाते. त्यामुळे वाहनचालकांना झेब्रा क्रॉसिंग काय प्रकार आहे, हे देखील लक्षात राहत नाही व वाहतुकीचे तीन-तेरा वाजतात. त्यामुळे वाहतूक सुरक्षा सप्ताहात या तत्परतेने वाहतुकीचे नियमन केले जाते. ते वर्षभर काय राहावे, अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे.